मैत्रेयच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी
By admin | Published: July 22, 2016 12:17 AM2016-07-22T00:17:13+5:302016-07-22T00:19:26+5:30
‘एस्क्रो’मध्ये अवघे सहा कोटी : तेरा हजार तक्रारदार; ३१ कोटींचे देणे
नाशिक : मैत्रेय कंपनीच्या संचालकांचा अंतरिम जामीन अर्जावर अंतिम निर्णय येत्या मंगळवारी (दि.२६) होणार आहे. गुरुवारी (दि.२१) जिल्हा व सत्र न्यायालयात दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.
दोषारोपपत्रापर्यंत दाखल झालेल्या तक्रारदारांची रक्कम भरली असून, अंतरिम जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद मैत्रेयकडून अॅड. राहुल कासलीवाल यांनी गुरुवारी केला, तर सरकारी वकील राजेंद्र घुमरे व चंद्रकोर यांनी वाढत्या तक्रारदारांची संख्या लक्षात घेता आणि एस्क्रो खात्यात संशयित आरोपींनी भरलेली रक्कम लक्षात घेता अंतरिम जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद केला. पोलीस आयुक्त एस.जगन्नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला लेखी अहवालही सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी न्यायालयापुढे सादर केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत जिल्हा व सत्र न्यायाधीश मोरे यांनी याप्रकरणी येत्या मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे सांगितले.
फसवणुकीची एकूण रक्कम ३१ कोटी २७ लाख रुपयांपर्यंत पोहचली असून, तक्रारदारांची संख्याही तेरा हजार ३५७ झाली आहे. तेरा हजार तक्रारदारांना त्यांची रक्कम द्यावी, ३१ क ोटी २७ लाख रुपयांचे देणे आहे. फक्त सहा कोटी ४२ लाख रुपये जमा आहेत. तक्रारदारांची संख्या वाढत आहे. पोलिसांकडे आतापर्यंत १३ हजार ३५७ गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या असून, फसवणुकीची रक्कम ३१ कोटी २७ लाख रुपयांपर्यंत पोहचली आहे. संशयित आरोपींनी एस्क्रो खात्यात ३१ कोटी २७ लाख रुपये जमा करण्याची मागणी सरकारी वकिलांनी यावेळी केली.(वार्ताहर)