मतदानासाठी व्यापारी बॅँकेचे ओळखपत्र अमान्य
By admin | Published: June 24, 2017 12:23 AM2017-06-24T00:23:16+5:302017-06-24T00:23:35+5:30
नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदानासाठी व्यापारी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नसून शासनाचे निवडणूक आयोगाने ठरविलेले ओळखपत्रेच ग्राह्य धरले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदानासाठी व्यापारी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नसून शासनाचे निवडणूक आयोगाने ठरविलेले सतरा ओळखपत्रेच ग्राह्य धरले जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी ११ मतदान केंद्रांवर एकूण ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे यांनी सांगितले.
व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे यांनी गुरुवारी उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी काही उमेदवारांनी मतदानासाठी व्यापारी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरू नये अशी मागणी केली. तर काही उमेदवारांनी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरावे अशी मागणी केली. याबाबत करे यांनी मतदानासाठी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नसल्याचे स्पष्ट करत केंद्र व राज्य शासनाचे निवडणूक आयोगाने ठरविलेले १७ ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
मतदान प्रक्रियेचे नियोजन
सत्तारुढ सहकार व प्रतिस्पर्धी श्री व्यापारी पॅनलने प्रचारामध्ये सभासदांच्या भेटीगाठी घेण्यावरच जोर दिला होता. तसेच ‘क्रॉस वोटिंग’ करू नये याकरिता सभासदांना दोन्ही पॅनलकडून गळ टाकण्यात येत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्ही पॅनलकडून सभासद मतदारांना मतदान स्लिपा घरोघर पोहचविण्यासाठी चांगलेच परिश्रम घेण्यात येत आहे. प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनलमध्ये काही उमेदवार एकमेकांचे नातेवाईक असल्याने क्रॉस वोटिंग होऊ नये, उमेदवाराने फक्त वैयक्तिक प्रचार किंवा मत मागू नये यासाठी दोन्ही पॅनलचे नेते, पदाधिकारी जाणीवपूर्वक लक्ष ठेवून आहे. रविवारी मतदानाच्या दिवशी कुठल्या मतदान केंद्रावर कोण उभे राहील, मतदार आणण्यासाठी वाहने आदींचे नियोजन दोन्ही पॅनलकडून केले जात आहे.