व्यापारी बँक भरवणार वसंत व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 01:01 AM2022-04-27T01:01:37+5:302022-04-27T01:01:56+5:30
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्यावतीने दत्त मंदिर रोड मनपा शाळा १२५ च्या मैदानावर १ ते १० मे दरम्यान सायंकाळी सात वाजता वसंत व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिकरोड : नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्यावतीने दत्त मंदिर रोड मनपा शाळा १२५ च्या मैदानावर १ ते १० मे दरम्यान सायंकाळी सात वाजता वसंत व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुंदर माझं घर व बालशिवाजी फेम कलाकार संयोगिता भावे यांच्या हस्ते रविवारी (दि.१) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. टीव्ही विश्व- भास आभास या विषयावर भावे यांचे व्याख्यान होणार आहे. दि. 2 रोजी सुरेखा बोऱ्हाडे या महिला स्वातंत्र्य सेनानींच्या रंजक कथा, दि. ३ रोजी जल व्यवस्थापनावर अशोक सोनवणे, दि.४ रोजी संताजी या विषयावर विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, दि. ५ रोजी महंत चिडे बाबा यांचे श्रीकृष्णा- काल, आज व उद्या, दि. ६ रोजी पत्रकार रमेश पडवळ हे नाशिकचा इतिहास व वारसास्थळे, दि.७ रोजी शाहीर स्वप्नील डुंबरे हे पोवाड्यातून शिवछत्रपती सादर करतील. दि. ८ रोजी औषधांचा भडिमार थांबविण्याच्या विषयावरील आनंदाच्या वाटा विषयावर संजय कळमकर, रात्रीस खेळ चाले या प्रसिध्द दूरचित्रवाणी मालिकेतील कलाकार माधव अभ्यंकर दि.९ रोजी गप्पागोष्टी करतील व दि. १० रोजी मुंबईतील लोककला अकादमीचे विभागप्रमुख गणेश चंदनशिवे यांच्या महाराष्ट्राची लोककला कार्यक्रमाने व्याख्यानमालेची सांगता होईल. व्याख्यानमालेत दररोज श्रोत्यांमधून लकी ड्रॉ काढून बक्षिसे दिली जातील, अशी माहिती उपाध्यक्ष सुधाकर जाधव यांनी दिली. यावेळी संचालक जगन आगळे, मनोहर कोरडे, बाबा सदाफुले, ॲड. सुदाम गायकवाड आदी उपस्थित होते.