पंचाहत्तरीतही मर्चंट दांपत्यांची रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:47+5:302021-09-12T04:17:47+5:30
सोयगाव : कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्र जास्त चर्चेत राहिले. अनेकांचे प्राण वाचल्याने डॉक्टर्स हे देवदूत भासले तर अनेक ठिकाणी डॉक्टरांवर ...
सोयगाव : कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्र जास्त चर्चेत राहिले. अनेकांचे प्राण वाचल्याने डॉक्टर्स हे देवदूत भासले तर अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होण्याच्याही घटना घडल्या. काही लोकांनी वैद्यकीय क्षेत्र बदनाम केले, तर काही लोकांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. मालेगावमधील डाॅक्टर दांपत्य अनिल व सौ. रिता मर्चंट यांनीदेखील मालेगावमध्ये कोरोनाकाळात बजावलेली रुग्णसेवा उल्लेखनीय ठरली.
अतिशय उदात्त अशा या पेशाला जरी काही लोक फक्त पैसे कमावण्याचे साधन म्हणून बघत असतील. पण काही चांगल्या लोकांमुळे ह्या पेशाचे पावित्र्य टिकून आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीने वागणारे काही डॉक्टर समाजात आहेत. त्यामुळे समाजाचा या क्षेत्रावर विश्वास टिकून आहे. असेच मालेगावातील एक डॉक्टर दाम्पत्य डॉ. अनिल व रिता मर्चंट यांची नावे घ्यावी लागतील. हे दाम्पत्य वयाच्या पंचाहत्तरीतसुद्धा मनोभावे रुग्णसेवा करते आहे. कोरोनाकाळातदेखील स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अगोदर रुग्णसेवा हेच ब्रीद घेऊन त्यांनी अनेक रुग्णांना सेवा दिली. मर्चंट मालेगावातील अतिशय जुने व अनुभवी डॉक्टर असून, पंचक्रोशीत त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते परिचित आहेत. डॉक्टर अनिल हे जुन्या काळातील एमबीबीएस असून, अतिशय माफक दरात रुग्णसेवा देतात. त्यांनी ठरवले असते तर खोऱ्यानी पैसा कमावला असता; पण त्यांच्या तत्त्वात ते कधी बसलेच नाही. रुग्ण किती गंभीर असो पण गरज असेल तरच इतर चाचण्या करणार. उगाच आला पेशंट म्हणून विनाकारण रक्त चाचण्या, इतर चाचण्या करून पैसा कमावणे हे त्यांनी कधीच धोरण अवलंबले नाही. कोरोनाकाळातदेखील त्यांनी सेवा अखंडितपणे चालू ठेवली. कोणी रुग्ण बाहेरगावी असेल अथवा येणे शक्य नसेल तर फोनवरसुद्धा त्याचा इलाज करतात. योग्य ते औषध स्वतः मेडिकल दुकानदाराशी बोलून द्यायला सांगतात.
डॉ. रिता मर्चंट यांचीदेखील समर्थ साथ असते. आलेली वृद्ध महिला असो तरुणी, प्रेमाने विचारपूस करून इलाज करणार. धीर देणार. विशेष म्हणजे तुमच्याकडे फी देण्यासाठी पैसे असो नसो डॉ. दाम्पत्य तुमच्यावर इलाज करणारच.
डॉ. अनिल व रिता मर्चंट यांचा दवाखाना मालेगाव कॅम्प येथे असला तरी पेशंट हे सर्व मालेगावातून येत असतात शिवाय आजूबाजूच्या खेड्यातीलदेखील रुग्ण येथेच येतात. डॉक्टर अनिल मर्चंट यांनी रोटरी क्लब मालेगावचे अध्यक्षपद भूषवले आहे. आज त्यांना वैद्यकीय सेवेचा ४० वर्षांचा अनुभव असून, भावी पिढीतील डॉक्टरांना ते प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला देतात.
- १० डॉ. अनिल मर्चंट १० डॉ. रिटा मर्चंट
100921\445810nsk_29_10092021_13.jpg~100921\445810nsk_31_10092021_13.jpg
- १० डॉ. अनिल मर्चंट~१० डॉ. रिटा मर्चंट