पारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 01:37 PM2021-01-28T13:37:38+5:302021-01-28T13:54:28+5:30

नाशिककरांना दिवसभर हवेत गारवा जाणवत नसला तरीदेखील सुर्यास्त होताच नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढते तसेच पहाटेसुध्दा सुर्योदयापर्यंत वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालेला असल्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरत आहे.

Mercury at 11 degrees: Cold snap in the city | पारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका

पारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका

Next
ठळक मुद्देबोचऱ्या थंडीचा नाशिककरांना अनुभवउत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला

नाशिक : शहर व परिसरात थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे. मागील चार दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली असल्याने वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरु लागला आहे. गुरुवारी (दि.२८) ११ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक नीचांकी किमान तापमान निफाडमध्ये ८.८अंशापर्यंत खाली घसरले. निफाड तालुका थंडीच्या कडाक्याने चांगलाच गारठला आहे.

आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढू लागल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. गेल्या गुरुवारीदेखील किमान तापमान ११.४ अंश इतके होते. सोमवारी मात्र अचानकपणे पारा १०.४अंशापर्यंत खाली घसरला होता. आठवडाभर किमान तापमान १४अंशाच्यापुढे सरकलेले नाही. यामुळे हा आठवडा थंडीची तीव्रतेची जाणीव करुन देणारा ठरला. पहाटे तसेच रात्रीच्या सुमारास वातावरणात गारठा अधिक जाणवत आहे. निरभ्र आकाशामुळे दिवसभर लख्ख प्रखर असा सुर्यप्रकाश राहत असल्याने कमाल तापमानाचा पारादेखील संध्याकाळपर्यंत ३० किंवा ३१ अंशापर्यंत वर सरकत आहे. नाशिककरांना दिवसभर हवेत गारवा जाणवत नसला तरीदेखील सुर्यास्त होताच नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढते तसेच पहाटेसुध्दा सुर्योदयापर्यंत वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालेला असल्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरत आहे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षी शाळांची घंटा वाजलीच नव्हती. प्राथमिक, माध्यमिक शाळा आता पुन्हा सुरु झाल्याने सकाळी थंडीच्या कडाक्यात शाळांमध्ये जाणाऱ्या चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांची लगबग पहावयास मिळत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी चिमुकले उबदार कपड्यांचा वापर करत पुन्हा 'धडे' गिरविण्यासाठी शाळांचा उंबरा ओलांडत आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला असून दिल्लीमध्ये थंडीचा प्रकोप वाढल्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्राच्याही वातावरणावर होताना दिसत आहे. पुढील काही दिवस नाशिक शहर व परिसरात थंडीची तीव्रता अशीच कायम राहणार असून किमान तापमानात अधिक घसरण होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे.

Web Title: Mercury at 11 degrees: Cold snap in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.