पारा ११.४ अंशावर : नाशकात थंडीचा जोर वाढला; नागरिकांना हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 05:56 PM2019-12-28T17:56:06+5:302019-12-28T17:59:07+5:30
नाशिक : शहरात या हंगामातील नीचांकी ११.४ अंश इतक्या तापमानाची नोंद शनिवारी (दि.२८) झाली. शहरात शुक्रवारी सकाळपासून थंड वारे ...
नाशिक : शहरात या हंगामातील नीचांकी ११.४ अंश इतक्या तापमानाची नोंद शनिवारी (दि.२८) झाली. शहरात शुक्रवारी सकाळपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्याने शनिवारी पारा अधिकच घसरलला. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
मागील तीन दिवसांपासून शहराचे किमान तापमान १५ अंशांच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र शुक्रवारी पारा १४ अंशावर आला. शनिवारी थेट तीन अंशांनी पारा घसरला आणि नाशिककरांना कडाक्याची थंडी जाणवू लागली. या हंगामात अद्याप १२.२ अंशापर्यंत तापमान खाली आले होते. मात्र शनिवारी ११.४ अंश ही सर्वात कमी नोंद झाली. निफाड तालुका सर्वाधिक गारठला आहे. तसेच मालेगाव तालुक्यातही थंडीचा जोर वाढल्याचे दिसून येते. तेथेही ११.६अंश किमान तापमानाची नोंद झाली. नाशिककरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. निफाडला आठवडाभरापुर्वी १० अंशापर्यंत तापमान खाली आले होते.
शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे नाशिककर उबदार कपड्यांचा वापरास प्राधान्य देताना दिसून येत आहे. उबदार कपड्यांना मागणी वाढल्याबरोबरच भावदेखील वधारल्याची स्थिती आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना उबदार कपडे खरेदी करताना महागाईचा ‘झळ’ बसू लागली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वच प्रकारचे उबदार कपडे महाग झाले आहे. दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी पहाटे व सकाळी थंडीपासून बचाव करताना दिसून आले. शनिवारी अचानकपणे पारा घसरल्याने चाकरमान्यांनी दिवसभर स्वेटर, हाफ जॅकेट परिधान करून कार्यालयात दैनंदिन कामकाज आटोपले. शहरासह जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास धुके पहावयास मिळत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात तसेच शहराजवळील खेड्यांमध्ये गोदाकाठावर शेकोट्यापासून उब मिळविण्याचा प्रयत्न रहिवाशांकडून केला जात आहे.