पारा १०.३ अंशावर : राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:10 PM2020-01-01T20:10:41+5:302020-01-01T20:20:16+5:30
शनिवारी किमान तापमानाचा पारा ११.२ अंशापर्यंत खाली आला होता. त्यानंतर मंगळवारी १२.२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले; मात्र बुधवारी अचानकपणे पारा थेट १०.३ अंशापर्यंत खाली घसरला.
नाशिक : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि.१) थंडीच्या चालू हंगामातील सर्वाधिक कडाक्याची थंडी नाशिककरांनी अनुभवली. या हंगामातील सर्वाधिक निचांकी १०.३ अंशापर्यंत पारा घसरला. यामुळे नाशिक हे राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले. पहाटेपासून नाशिककरांना हुडहुडी भरली होती. तसेच दिवसभर नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करण्यास पसंती दिली.
शहराचा किमान तापमानाचा पारा घसरत असून नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मागील शनिवारपासून येऊ लागला आहे. शनिवारी किमान तापमानाचा पारा ११.२ अंशापर्यंत खाली आला होता. त्यानंतर मंगळवारी १२.२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले; मात्र बुधवारी अचानकपणे पारा थेट १०.३ अंशापर्यंत खाली घसरला. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अधिकच अनुभवयास आली. शनिवारपासून शहरात थंडीचा कडाका कायम आहे आहे. थंडीच्या कडाक्यात वाढ होऊन पारा १० अंशापर्यंत खाली आल्याने नाशिककर गारठले. मंगळवारी रात्री अधिक वेगाने थंड वारे वाहण्यास सुरूवात झाली. यामुळे बुधवारी पहाटेच्या सुमारास कडाक्याची थंडी शहरात पडली. दिवसभर लख्ख सुर्यप्रकाश असतानाही वातावरणात गारठा जाणवत होता.
उत्तरेकडून येणा-या शीतलहरीमुळे शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. नव्या वर्षाचा पहिल्या आठवड्यात थंडीची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरमध्ये बफवृष्टी जोरदार सुरू असून तेथील धबधबेदेखील गोठले गेले असून किमान तापमान उणे झाले आहे. यामुळे उत्तर भारत गारठला आहे. परिणामी या वातावरणाचा परिणाम उत्तर महाराष्टÑासह विदर्भ, मराठवाड्यावरही होऊ लागला आहे.
आरोग्यावर परिणाम
थंडीचा कडाका वाढताच बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना पहावयास मिळत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जात आहे. तसेच थंड गुणधर्माची फळे तसेच अन्य पदार्थ खाणे टाळावे, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहाटे तसेच रात्री घराबाहेर पडताना नाका-तोंडावर रुमाल किंवा उबदार कापड व डोक्यावरदेखील टोपी परिधान करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
या शहरांमध्ये थंडीचा कडाका (किमान तापमान)
महाबळेश्वर- १०.६
चंद्रपूर- १०.६
पुणे - १०.८
सातारा-१२.१
नागपूर- १३.४
नाशिक जिल्ह्यातील किमान तापमान
शहर : १०.३
निफाड : ९
इगतपुरी : ९
सिन्नर : १०
मालेगाव : ११