पारा तापदायक : उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 09:29 PM2018-03-27T21:29:29+5:302018-03-27T21:29:29+5:30
एकूणच नाशिक ऊन्हामुळे तापले आहे. कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही वाढत असल्याने वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे.
नाशिक : मार्चअखेर शहरासह जिल्ह्यात ऊन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले आहे. कमाल तपमानाचा पारा पस्तीशीच्या पुढे सरकला असून मंगळवारी (दि.२७) मालेगावमध्ये कमाल तपमान ४०.२ अंश तर नाशिकमध्ये ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली.
चालू महिन्याचा पंधरवडा उलटत नाही तोच उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्यास सुरूवात झाली. नाशिक शहराचे तपमान तीस अंशापुढे सरकण्यास सुरूवात झाली. कमाल तपमानात सातत्याने वाढ होऊ लागल्याने नाशिककरांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. वीस मार्चपासून कमाल तपमानाचा पारा पस्तीशीपर्यंत सरकला आणि आता मार्चअखेर तपमान जिल्ह्यात चाळीशीपर्यंत पोहचले आहे तर शहरात चाळीशीच्या जवळपास आले आहे. एकूणच नाशिक ऊन्हामुळे तापले आहे. कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही वाढत असल्याने वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. हवेतील गारवा जवळपास संपुष्टात आला असून दुपारनंतर वारादेखील उष्ण स्वरुपाचा वाहू लागल्याचे जाणवत आहे. त्यामुळे नागरिक शक्यतो बारा वाजेनंतर घराबाहेर पडणे टाळत आहे. घराबाहेर पडताना नाशिककर योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहे.
शहराचे वाढत्या कमाल तपमानामुळे उकाडाही प्रचंड जाणवत आहे. उन्हाच्या तीव्रता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. तपमानाचा पारा एप्रिलच पहिला आठवड्यासंपल्यानंतर काहीसा खाली उतरण्यास सुरूवात होईल. मागील वर्षी २७ मार्च रोजी शहराचे तपमान ४०.३ इतके नोंदविले गेले होते. तसेच २९ मार्चपर्यंत सलग चाळीशीवर कमाल तपमानाचा पारा स्थिरावलेला होता. त्यामुळे यंदाही कमाल तपमानाची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. कारण पारा चाळीशीच्या जवळपास आला आहे. वाऱ्याचा वेग वाढल्यास कमाल तपमानात काहीशी घट होण्याची आशा आहे. मात्र गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यामधील कमाल तपमानाची आकडेवारी बघता पारा पस्तीशीच्या जवळपास राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकूणच पुढील दोन महिने नाशिकरांना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
साप्ताहिक कमाल तपमान असे...(अंशात)
दिनांक - तपमान
२१ - ३३.८
२२ - ३३.०
२३ - ३३.७
२४ - ३६.३
२५ - ३७.३
२६ - ३८.१
२७ - ३८.५