पारा चाळिशीपार; शहरात वाढला उन्हाचा चटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:02 AM2019-05-22T01:02:35+5:302019-05-22T01:02:52+5:30
हंगामाच्या अखेरीस शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला आहे. दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे स्थिरावत असल्याने शहर पुन्हा तापल्याचे चित्र आहे.
नाशिक : हंगामाच्या अखेरीस शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला आहे. दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे स्थिरावत असल्याने शहर पुन्हा तापल्याचे चित्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत.
चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता. मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले. सोमवारी मात्र पारा चाळिशीपार सरकला तसेच मंगळवारी (दि.२१) ४०.१ अंशांपर्यंत कमाल तापमान पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.
यावर्षी तीव्र उन्हाळा
यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामात दहा वर्षांचा विक्रम मोडला. मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानापेक्षा जास्त तापमान मागील महिन्यात २७ तारखेला ४२.७ अंश इतके नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते.