पारा थेट शून्यावर! काश्मीरमधील थंडीचा अनुभव घ्यायचाय तर चला नाशिकला
By अझहर शेख | Published: December 30, 2018 10:27 PM2018-12-30T22:27:55+5:302018-12-30T23:12:04+5:30
तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरश: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या आहे.
नाशिक : निफाड तालुक्याला राज्याचे काश्मीर म्हटले तर वावगे होणार नाही. कारण मागील दहा दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरत आहे. निफाडमध्ये रविवारी कुंदेवाडी कृषी केंद्रात २.८ अंश तापमान मोजले गेले, तर उगावमध्ये पारा शून्यावर तसेच ओझरमध्ये थेट ०.९ आणि कसबे-सुकेणे येथे १ अंशापर्यंत तापमान खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्रककडून करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड लाटेचा परिणाम नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर अधिक झाला आहे. किमान तापमानाचा पारा वेगाने घसरू लागल्याने निफाड गोठले आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरक्ष: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या असून, जागोजागी नागरिकदेखील उसाचे चिपाडे पेटवून शेकोटीद्वारे थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. निफाडमधील नांदूरमधमेश्वर अभयारण्यापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या उगावमध्ये पारा थेट शून्यावर घसरल्याने तेथे पाण्याचा बर्फ झाल्याचा अनुभव नागरिकांना रविवारी सकाळी आला. तसेच ओझर येथे ०.९ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली तर कसबे-सुकेणे येथे पारा १ अंशापर्यंत घसरला. कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्रात मात्र सकाळी २.८ अंश इतके तापमान नोंदविले गेले.
द्राक्षांचा हंगाम धोक्यात
निफाड तालुक्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद सातत्याने होत आहे. नागपूरमध्ये रविवारी ४ अंशांपर्यंत जरी पारा घसरला असला तरी निफाडमध्ये कृषी संशोधन केंद्रात २.८ अंशांपर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. यामुळे निफाड या बागायती तालुक्यातील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागांमध्ये अक्षरक्ष: शेतकºयांना शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत. तसेच द्राक्षमळ्यावरदेखील आच्छादन टाकण्यात आले आहे. दवबिंदूचा बर्फ होऊन जमिनीवर पडत आहे. चापडगाव, खानगावथडी, तारुखेडले, कसबे सुकेणे आदी गावांमध्ये दवबिंदू गोठल्याचे चित्र पहावयास मिळाले