पारा १२ अंशावर : आज नाशिककरांनी अनुभवली थंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 06:17 PM2018-10-30T18:17:23+5:302018-10-30T18:20:15+5:30
मागील तीन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा १६ अंशावरून १२.१ अंशापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत नाशिककरांना पहाटे तसेच रात्रीही थंडी अधिक जाणवण्यास सुरूवात झाली.
नाशिक : हळुवारपणे थंडीचे शहरात आगमन झाले असून रात्री तसेच पहाटे गुलाबी थंडी नाशिककरांना जाणवू लागली आहे. कमाल तपमानाचा पारा तीशीच्या पुढे असल्याने सकाळी सात वाजेनंतर थंडीची तीव्रता अद्याप जाणवत नसली तरीदेखील बुधवारी मात्र नाशिककरांना पहाटे चांगलीच तीव्रता थंडीची जाणवली. वातावरणात गारठा निर्माण झाला होता. किमान तपमानाचा पारा १२.१ अंशापर्यंत घसरल्याने संध्याकाळी सहा वाजेनंतर हवेत गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.
सोमवारी (दि.२९) १३.३ अंशापर्यंत पारा खाली आला. यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे थंडीचे उशिरा व हळुवारपणे आगमन झाले आहे. नवरात्रोत्सवानंतर उन्हाचा चटका कमी होण्यास सुरूवात झाली. दसऱ्याचा सण पार पडताच रात्री वातावरणात गारवा जाणवू लागला होता. सध्या पहाटे थंडी चांगलीच अनुभवयास येत आहे. मात्र सात वाजता सुर्यकिरणे जमिनीवर येताच थंडी गायब होत आहे. कमाल तपमान अद्यापही तीशीच्यापुढे असल्यामुळे थंडीचा फारसा प्रभाव वातावरणात जाणवत नाही. सकाळी दहा वाजेनंतर उन्हाची तीव्रता नाशिककरांना दिवसभर अजूनही अनुभवयास येत आहे. आॅक्टोबरअखेर थंडीचे आगमन झाल्याने पुढील महिन्यात किमान तपमानाचा पारा अधिक घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यात दिवाळी साजरी होत असल्याने वातावरणात काहीसा उष्मा टिकून राहण्याची शक्यता आहे; मात्र त्यानंतर थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा १६ अंशावरून १२.१ अंशापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत नाशिककरांना पहाटे तसेच रात्रीही थंडी अधिक जाणवण्यास सुरूवात झाली. शनिवारी (दि.२०) किमान तपमानाचा पारा १९ अंशावर होता. या दहा दिवसांत किमान तपमानाचा पारा १३ अंशापर्यंत घसरला. यामुळे पुढील आठवड्यात किमान तपमानात अधिक घसरण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.