पारा थेट ५.१अंशावर : नाशकात थंडीचा कहर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 02:05 PM2018-12-29T14:05:34+5:302018-12-29T14:11:21+5:30
थंडीचा कडाका वाढल्याने दिवस-रात्र नागरिक अंगावर उबदार कपडे परिधान करुन ठेवणे पसंत करत आहेत. यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला
नाशिक : पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहे. शनिवारी (दि.२९) या हंगामातील सर्वाधिक नीचांकी ५.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढल्याने दिवस-रात्र नागरिक अंगावर उबदार कपडे परिधान करुन ठेवणे पसंत करत आहेत.
यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा पाच अंशापर्यंत घसरला होता. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ इतके नीचांकी तापमान त्या हंगामातील नोंदविले गेले होते; मात्र चालू वर्षी डिसेंबर अखेर पारा ५ अंशापर्यंत घसरला असून गेल्या वर्षाची नोंद मागे पडली असून ५.१ ही यावर्षी हंगामातील नीचांकी नोंद ठरली. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरीचा परिणाम वातावरणावर झाला आहे. त्यामुळे नाशिक गारठले असून निफाड तालुका गोठला आहे. द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकमधील बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे चांगलेच धास्तावले आहे.
शुक्रवारी दिवसभर वातावरणात गारठा कायम होता. तसेच थंड वा-याचा वेगदेखील अधिक राहिल्यामुळे दिवसभर ऊन पडून न पडल्यासारखेच होते. परिणामी वातावरणात उष्मा निर्माण होऊ शकला नाही. सुर्यास्तानंतर पुन्हा थंड वारे अधिक वेगाने वाहू लागल्याने मध्यरात्रीपर्यंत थंडीचा कडाका अधिकच वाढला होता. शनिवारी पहाटे नागरिकांनी घरबाहेर पडणे पसंत केले नाही. परिणामी जॉगींग ट्रॅकवरील संख्या रोडावल्याचे चित्र पहावयास मिळाले. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पेठरोडवरील हवामान केंद्राकडून निरिक्षण नोंदविण्यात आले असता किमान तापमानाचा पारा थेट ५.१ अंशावर घसरल्याची नोंद करण्यात आली. अधिक वेगाने वाहणाºया थंड वा-यामुळे कमाल तपमानही घसरले. २३.९ इतके कमाल तापमान नोंदविले गेले.
सर्दीपडशाचे रुग्ण वाढले
थंडीचा वाढता कडाका नागरिकांना असह्य होऊ लागला आहे. वाढत्या थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये सर्दीपडशे, थंडी-तापाचे रुग्ण पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे वापरण्यास प्राधान्य द्यावे. थंड खाद्यपदार्थ खाणे टाळावे. जास्त रसदार फळेदेखील आहारात खाऊ नये. पाणी उकळून प्यावे,अशा उपाययोजना शहरातील डॉक्टरांनी सुचविल्या आहेत.