पारा चाळिशीपार नाशिक पुन्हा तापलंय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:12 AM2019-04-24T01:12:57+5:302019-04-24T01:13:18+5:30
एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.
नाशिक : एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आठवड्यावर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांसह त्यांचे नेतेही घामाघुम होऊन प्रचारासाठी उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे शहराचे हवामान दमट झाले असून, शहराच्या वातावरणात उष्मा वाढला आहे. एप्रिलअखेर शहराच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. प्रखर उन्हाची तीव्रता नागरिकांनी मंगळवारी अनुभवली. कमाल तापमान ४०.१ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. किमान तापमान २०.३ अंश इतके नोंदविले गेले. कमाल व किमान तापमानात होणाऱ्या वाढीमुळे वातावरणात कमालीचा उष्मा आणि रात्री उकाडाही जाणवू लागला आहे.
त्यामुळे दिवसाचा उष्मा आणि रात्रीचा उकाडा नाशिककरांना असह्य होऊ लागला आहे. चालू महिन्यात १३ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९.७ अंशांपर्यंत गेले होते. आठवडाभरानंतर तापमानाने चाळिशी गाठली आहे. गेल्या महिन्यात २८ तारखेला या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४०.४ इतके कमाल तापमान नोंदविले गेले. एकूणच मार्च महिन्यापासून नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. चालू महिनाअखेरही तापमानाने चाळिशी गाठल्याने महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत पारा मार्च महिन्यातील तापमानाची नोंद मोडून काढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिल्लीच्या हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार आहे. या पाच दिवसांत या राज्यांत उष्णतेचा कहर होणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्टÑाच्या वातावरणावरही त्याचा परिणाम जाणवणार आहे. नागरिकांनी पुढील तीन ते चार दिवस विशेष खबरदारी घेत उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यावर भर देण्याची गरज आहे.