नाशिककर गारठले : तपमानाचा पारा ११.६ अंशापर्यंत घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:01 PM2018-11-28T13:01:45+5:302018-11-28T13:04:44+5:30
मंगळवारी ११.२ इतके नीचांकी तपमान या हंगामातील नोंदविले गेले. पंधरवड्यापूर्वी ११.८ अंशांपर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर पुन्हा किमान तपमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती.
नाशिक : शहराचा पारा अचानकपणे घसरला असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना सोमवारी (दि.२७) रात्रीपासून हुडहुडी भरली आहे. मंगळवारी पहाटेदेखील कडाक्याची थंडी नाशिकरांनी अनुभवली. ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद हवामान केंद्राकडून मंगळवारी करण्यात आली होती. आज बुधवारी (दि.२८) ११.६ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले.
आठवडाभरापासून थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा रविवारी १३ अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे संध्याकाळी व पहाटे हवेत गारवा निर्माण झाला होता. थंडीची तीव्रताही सोमवारी रात्रीपासून अचानकपणे वाढली. मंगळवारी ११.२ इतके नीचांकी तपमान या हंगामातील नोंदविले गेले. पंधरवड्यापूर्वी ११.८ अंशांपर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर पुन्हा किमान तपमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती. आठवडाभरापूर्वी किमान तपमानाचा पारा १९ अंशांपर्यंत वर सरकल्याने नाशिककरांचे पंखे दिवसा-रात्री वेगाने फिरू लागले होते. वातानुकूलित यंत्रांचाही वापर नागरिकांकडून केला जाऊ लागला होता. कारण उष्मा जाणवत होता; मात्र पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती बदलली. सध्या दोन दिवसांपासून नाशिकरांनी उबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला आहे.
काही खासगी शाळांची सुटी संपल्यामुळे सकाळी चिमुकल्यांना शाळेत सोडताना पालकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, टोपी, मफलर, जॅकेटचा वापर केला जात आहे. लहानगेही संपूर्णत: ‘पॅक’ होऊन शाळेत जाताना दिसून येत आहे. दूधविक्रे ते, वर्तमानपत्र विक्रेत्यांसह ज्यूसविक्रेत्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे संध्याकाळी बाजारपेठांमध्ये लवकर शुकशुकाट दिसू लागला आहे. किमान तपमानाचा पारा जरी घसरत असला तरीदेखील कमाल तपमानाचा पारा अजूनही तिशीपारच असल्यामुळे सूर्योदयानंतर थंडीचा प्रभाव कमी होत असून सकाळी ८ वाजेनंतर थंडीची तीव्रता सुंपष्टात येत आहे; मात्र संध्याकाळी साडेसहा वाजेपासूनच थंडीचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे. १३ नोव्हेंबर रोजी ११.५ इतके किमान तपमान नोंदविले गेले होते.
---
प्रमुख शहरांमधील किमान तपमान असे
रत्नागिरी : १९.७
डहाणू : २१.२
पुणे : १२.३
अहमदनगर: १०.२
नाशिक : ११.६
मालेगाव : १३.८
महाबळेश्वर : १५.२
अकोला :१३.५
गोंदिया ११.४