‘मी-टू’ चळवळीविरुद्ध जोक करणाऱ्यांची दया येते -अनिता दाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:02 PM2018-10-13T15:02:23+5:302018-10-15T14:07:28+5:30
‘मी-टू’ चळवळीविरुद्ध महिलांवर अत्याचार करत असणाºया, महिलांकडे चुकीच्या दृष्टीने पाहणाºया पुरुषांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुरू असलेले जोक्स, कमेंटस, मॅसेजेस, कार्टुन्स हे खेदजनक.
नाशिक : महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत देशभर विविध क्षेत्रांतील महिलांनी ‘मी-टू’ चळवळीअंतर्गत व्यक्त व्हायला सुरुवात केलेली आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून त्याविषयी भरभरून वाचायला मिळत आहे. याचवेळी दुर्दैवाने ‘मी-टू’ चळवळीची खिल्ली उडवणारे जोक, संदेश यांनाही पूर आला आहे. असे जोक लाइक करणाऱ्या, फॉरवर्ड करणाºयांची दया येत असल्याची भावना अभिनेत्री अनिता दाते हिने व्यक्त केली. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता याविषयासह इतर अनेक पैलूंवर तिने प्रकाश टाकतानाच स्त्रियांना कणखर होण्याचे आवाहनही केले. त्यांच्याशी साधलेला हा संवाद
प्रश्न : तुला ‘मी-टू’ चळवळीबद्दल काय वाटते?
उत्तर: ही चळवळ अत्यंत गरजेची आहे. अन्याय होत असेल, शारीरिक, मानसिक त्रास होत असेल तर महिलांनी, मुलींनी बोलले पाहिजे. तत्काळ त्याला वाचा फोडली पाहिजे. आपल्याला असणाºया कायदेशीर कवचाची मदत घेतली पाहिजे. ‘मी-टू’ चळवळीविरुद्ध महिलांवर अत्याचार करत असणाºया, महिलांकडे चुकीच्या दृष्टीने पाहणाºया पुरुषांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुरू असलेले जोक्स, कमेंटस, मॅसेजेस, कार्टुन्स हे खेदजनक असून, असे जोक फॉरवर्ड आणि लाइक करणाºयांचीही दया येते. अशा काही चळवळींची खर तर गरज आहे. त्यातले गांभीर्य समजून घेतले पाहिजे.
प्रश्न : इतक्या वर्षांनंतर प्रकरण बाहेर येत असतील तर त्याचे काय होऊ शकते?
उत्तर: त्या त्या प्रकरणांच्या बाबतीत खरं, खोटं आपण नाही सांगू शकत. पण त्या त्या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी पुढे आले पाहिजे, मदत केली पाहिजे. न्यायाच्या, सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. या प्रकरणांचे पुढे काय होईल, याबाबत लगेच काहीच स्पष्ट सांगता येणार नाही. पण अत्याचार करणारा माणूस लहान असो वा मोठा असो, तो दोषी आहे. त्याकडे त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे. तो किती मोठा आहे, प्रतिष्ठित आहे असे उदात्तीकरण करणे चुकीचे आहे. याबाबतीत माणूस महत्त्वाचा नसून कृती महत्त्वाची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वाईटाला वाईटच म्हटले पाहिजे. आज जेव्हा अशी चळवळ उभी राहिली आहे, तेव्हा भविष्यात महिलांवर अन्याय करायला लोक घाबरतील. ही एक चांगली सुरुवात आहे. तिला प्रत्येकाने पाठिंबा दिला पाहिजे. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये. महिलांनी वेळीच चुकीच्या गोष्टींचा प्रतिकार करावा. मनात ठेवू नये, घाबरू नये.
प्रश्न : फिल्म इंडस्ट्रीची म्हणून एक ‘विशाखा’ समिती असावी का?
उत्तर : फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर सगळीकडेच महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. इंडस्ट्रीत अभिनेत्रींच्या बाबतीत चुकीचे होत असेल तर प्रसारमाध्यमांकडेही त्या व्यक्त होतात. फिल्म इंडस्ट्री ही वेगळ्या प्रकारची संस्था आहे. कलाकारांची कुठलीही संघटना नसते. त्यामुळे हे कसे अस्तित्वात येऊ शकेल माहीत नाही, पण तसे काही झाले तर चांगलेच होईल. फिल्म इंडस्ट्रीतल्या पुरुषांनाही त्याचा धाक वाटेल.
प्रश्न : तू आज इतके वर्षे इंडस्ट्रीत आहेस. तुझे काय निरीक्षण, अनुभव सांगशील?
उत्तर : इंडस्ट्रीत आणि सगळीकडेच वाईट माणसं असतात तशी चांगलीही माणसंदेखील असतात. चुकीचे वागणाºयांना तिथल्या तिथेच सरळ केले पाहिजे. प्रत्येक बाईने आपण काम करत असलेल्या ठिकाणी चांगल्या लोकांची सपोर्ट सिस्टीम तयार ठेवली पाहिजे. दुर्दैवाने असे काही घडत असेल तर ती तुमच्या पाठीशी उभी राहील. तुम्हाला वाचवेल. यासाठी तुमचे वागणेही महत्त्वाचे ठरते.