वरुणराजाच्या उपस्थितीत गणरायाला निरोप

By admin | Published: September 16, 2016 10:12 PM2016-09-16T22:12:45+5:302016-09-16T22:19:04+5:30

दिंडोरी, ओझर, त्र्यंबकेश्वर, निफाड : मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

Message to Ganaraya in the presence of Varunaraja | वरुणराजाच्या उपस्थितीत गणरायाला निरोप

वरुणराजाच्या उपस्थितीत गणरायाला निरोप

Next

नाशिक : भक्तांच्या उत्साही वातावरणात, तुरळक पावसाच्या सरींचा आनंद घेत जिल्हाभरात विविध ठिकाणच्या नदीपात्रात व लहान-मोठ्या तलावात मूर्ती विसर्जित करून गणरायाला निरोप देण्यात आला.
ओझर : येथे सकाळपासून पावसाचे वातावरण असल्याने कार्यकर्त्यांचा थोडा हिरमोड झाला होता. परंतु रिमझिम पावसातही उत्साही वातावरणात गणेश विसर्जनासाठी नाचत गाजत मिरवणूक निघाल्या. घरगुती गणरायाला येथील असलेल्या बाणगंगा नदी असलेल्या वेशीजवळील नदीकाठी, मठाजवळील बंधाऱ्यावर विसर्जन करण्यात आले, तर मोठ्या गणेश मंडळांनी पिंपळगावजवळील कादवा नदीत विसर्जन केले. यंदा मूर्तिदान संकल्पना किंवा कृत्रिम तलाव नसल्यामुळे निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. लहान मुले ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या घोषणा देत होते. तसेच येथील विविध मित्रमंडळांनी दुपारनंतर मिरवणुकीला सुरुवात केली.
सर्वप्रथम सुतार गल्लीजवळील इच्छापूर्ती गणेश मंडळाने सुरुवात केली. त्यानंतर कासार लेन मित्रमंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यानंतर मेनरोड येथील ओझरचा राजा मित्रमंडळाने एका पोशाखात मिरवणूक काढली. नंतर शिवाजी चौक रुपेश्वर मित्रमंडळ, वीर तानाजी चौक मानाचा राजा मित्रमंडळ, राजे शिवछत्रपती मित्रमंडळ, हिंदुहृदयसम्राट सर्कलचा इच्छामणी गणेश, महाराणा फ्रेंड सर्कल, शिंदे मळा मित्रमंडळ, संभाजी चौक मित्रमंडळ, यंगस्टार मित्रमंडळ, अमर मित्रमंडळ, कन्सारा मित्रमंडळ, मोरया फ्रेड सर्कल आदि मंडळांनी आपल्या गणरायाला निरोप दिला. यावेळी २१ फुटी मानाचा राजावर होणारी पुष्पवृष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. परिसरात सर्वत्र रिमझिम पाऊस असूनही उत्साह ओसंडून वाहत होता. पावसात भिजत डीजेच्या तालावर नाचत तरु णाईने बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं साकडं घालून भावपूर्ण निरोप दिला. यावेळेस शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात शाही मिरवणुकांनी बाप्पाला निरोप
पेठ : सजवलेल्या घोड्यावर हातात समशेर घेऊन रुबाबात आरूढ झालेले जय मल्हार, सोबतीला विविध वेशभूषेत जेजुरीकरांचा गराडा, घोडे, उंट यांची सलामी आणि ढोल-ताशांच्या आवाजावर थिरकणारे पेठवासीय अशा शाही मिरवणुकीने पेठ शहरातील गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.
येथील शिवमुद्रा फ्रेंड्स सर्कलची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीकांत जाधवर यांनी साकारलेली जय मल्हारची भूमिका मिरवणुकीचे आकर्षण ठरली. हत्ती, घोडे, उंट यांचा मिरवणुकीत समावेश करण्यात आला होता. शिवरायापासून ते मावळ्यांपर्यंत वेशभूषा केलेली चिमुकली मंडळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. जि. प. सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी शिस्तीचे दर्शन दाखवले. पेठ शहरातून भव्य मिरवणुकीनंतर संगमेश्वर बंधाऱ्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळांसमवेत घरगुती गणेशाचेही गणेशभक्तांनी उत्साहात विसर्जन केले. पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.
इगतपुरीत गणरायाला निरोप
इगतपुरी : समस्त भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाला इगतपुरी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात व मंगलमय वातावरणात वरुणराजाच्या साक्षीने निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरात गर्दी उसळली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’, मोरया रे बाप्पा मोरया रे’, ‘अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर’ या घोषणांनी परिसर निनादून गेला होता.
इगतपुरी शहरासह तालुक्यातील बोरटेंभे, टाकेद, कावनई, वाडीवऱ्हे, मुकणे, सांजेगाव, पाडळी देशमुख, गोदें, भावली, नांदगाव सदो, मोगरे, मालुंजे, खेड, मुंढेगाव, देवळे, आहुर्ली, साकर, खेड, माणिकखांब, बेलगाव तऱ्हाळे, कवडदरा, वैतरणा, साकूर, अस्वली स्टेशन, कुऱ्हेगाव, उभाडे, उंबरकोन, धामणगाव आदि भागात जल्लोषमय वातावरणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात
आले.

Web Title: Message to Ganaraya in the presence of Varunaraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.