गणरायाला आज निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:59 AM2017-09-05T00:59:22+5:302017-09-05T00:59:31+5:30
नाशिक : चैतन्याने भारलेल्या आणि मंतरलेल्या गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (दि.५) अनंत चतुर्दशीला होत असून, बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांसह सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्णत्वाला आली आहे. महापालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरातील २६ नैसर्गिक ठिकाणी सज्जता ठेवली आहे शिवाय, २८ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. गणेशभक्तांनी नदीपात्राऐवजी या कृत्रिम तलावांमध्ये बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिक : चैतन्याने भारलेल्या आणि मंतरलेल्या गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (दि.५) अनंत चतुर्दशीला होत असून, बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांसह सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्णत्वाला आली आहे. महापालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरातील २६ नैसर्गिक ठिकाणी सज्जता ठेवली आहे शिवाय, २८ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. गणेशभक्तांनी नदीपात्राऐवजी या कृत्रिम तलावांमध्ये बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि.४) अखेरच्या दिवशी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. सार्वजनिक मंडळांचे देखावे, आरासचा नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.
गणेशोत्सवाचा समारोप मंगळवारी होणार असून पूर्वसंध्येला भक्तांचा जनसागर शहरात पहावयास मिळाला. भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने रस्ते फुलले होते.
कोटी कोटी रूपे तुझी..., आला आला माझा गणराज आला... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी दुमदुमलेल्या वातावरणात भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेतले. बारा दिवसांपासून शहरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झालेली पहावयास मिळत आहे; मात्र हे वातावरण उद्या संपुष्टात येणार आहे. विसर्जनाचा जल्लोष करत बाप्पाला भावपूर्ण निरोप देत ‘पुढच्या वर्षी लवकर या...,’ अशी साद भक्तांकडून घातली जाणार आहे.
विसर्जनासाठी नैसर्गिक ठिकाणे
नाशिक पूर्व विभाग - शितळादेवी मंदिर, टाळकुटेश्वर घाट, लक्ष्मीनारायण घाट, टाकळी संगम पूल.
नाशिक पश्चिम विभाग - यशवंतराव महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमानघाट.
पंचवटी विभाग- रामवाडी चिंचबन गोदापार्क, म्हसरूळ सीता सरोवर, वाघाडी नदी राजमाता मंगल कार्यालय, नांदूर-मानूर गोदावरी पूल, तपोवन कपिला संगम, रामकुंड परिसर, अहल्यादेवी पटांगण, रोकडोबा सांडवा ते टाळकुटेश्वर पूल, गौरी पटांगण गोदावरी नदी परिसर.
नाशिकरोड विभाग - चेहेडी दारणा नदीघाट, वालदेवी नदी विहितगाव, देवळाली गाव वडारवाडी, वडनेरगाव पंपिंग जवळ, दसकघाट, संत जनार्दन स्वामी पूल दसक-जेलरोड.
सातपूर विभाग - आसारामबापू पुलाच्या उत्तरेला मते लॉन्सजवळ, आनंदवली चांदसी पुलाखाली, सोमेश्वर धबधबा, नासर्डी नदीवरील पूल, गणेशघाट, आयटीआय पुलाशेजारी, शाहूनगर.
सिडको विभाग- वालदेवी नदीघाटाजवळ. मूर्ती संकलनाची व्यवस्था
महापालिकेने सहाही विभागात मूर्ती विसर्जनाकरिता २६ नैसर्गिक ठिकाणे निश्चित केली आहेत.
याठिकाणी गणेशमूर्ती दान स्वरूपात स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मूर्तीसंकलनाकरिता विविध संस्था-संघटनांचा सहभाग राहणार असून, महापालिकेचेही प्रत्येकी दोन कर्मचारी मूर्ती स्वीकारण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. मागील वर्षी २ लाख ३९ हजार मूर्ती दान स्वरूपात संकलित करण्यात आल्या होत्या. यंदा यात वाढ होण्याची शक्यता आहे.