प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा संदेश देणारी पणती...
By admin | Published: October 25, 2016 11:33 PM2016-10-25T23:33:20+5:302016-10-25T23:34:14+5:30
प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा संदेश देणारी पणती...
येवला : तीमिराकडून तेजाकडे.. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा कृतीतून संदेश देणारी पणती तयार करण्यात सध्या कुंभार गुंतले आहेत.
या कुंभारांचेही जीवन या पणतीप्रमाणेच आहे. तळहातावर मातीचा गोळा घेऊन शेकडो वर्षांपासून दिवाळीला पणत्या आणि बोळकीसह मातीच्या वस्तू आजही बनवत आहे. पणत्यातून जगाला प्रकाशाचा मार्ग दाखवत असलेल्या कुंभाराला मात्र आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे.
येवला तालुक्यात काही मोजक्या गावांत मातीचे साहित्य तयार करण्याचे काम कुंभार लोक करीत आहेत. ग्राहक स्वस्त पणत्याला पसंती देत असतो. सध्या या मातीच्या भांड्याच्या कामापासून कुंभार परवडत नसल्याने दूर जात असल्याचे चित्र आहे.
चिनी मातीच्या पणत्या बाजारात आल्यापासून मातीच्या पणत्यांचा भाव कमी आणि मागणीही कमी झाली आहे. कुंभार समाजातील अनेकांना या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही आर्थिक साधन नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु पूर्वापार चालत आलेला पारंपरिक व्यवसाय अंगवळणी पडला असल्याचे रसाळ यांनी सांगितले. थोडी शेती आणि मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय करीत मुलांचे शिक्षण चालू आहे.
पर्यावरणपूरक असलेल्या मातीच्या पणत्यांची मागणी सध्या कमी झाली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना कुंभार कामाची कला शिकविण्याची इच्छा अजिबात नाही. शिक्षण देऊन मुलांचे भवितव्य घडवायचे असे विचार अंबादास रसाळ यांनी मांडले. व्यवसायात अधिक आधुनिकता आणायची म्हटले तर पैसे कोठून आणायचे? शासनाने या व्यवसायाला मदत करायला हवी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)