पालिका आयुक्तांना भेटले अन् अवघ्या तासाभरात रस्त्यावरील अतिक्रमण हटले
By श्याम बागुल | Published: April 27, 2023 07:23 PM2023-04-27T19:23:51+5:302023-04-27T19:26:44+5:30
मध्यवर्ती भागात मोहीम : अतिक्रमण हटविण्यात सातत्य राखण्याचे आदेश
नाशिक - शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या सराफ बाजार, मेनरोड, रविवार कारंजा, शालीमार आदी भागात फेरीवाले, हातगाडी विक्रेते व रस्त्यावर बसतात. त्याच्यांकडून होणाऱ्या अतिक्रमणामुळे परिसरात पायी चालणेही कठीण होते. अशी तक्रार घेऊन सराफ व कापड विक्रेते महापालिका आयुक्तांना भेटले आणि अवघ्या तासाभरातच अतिक्रमण विभागाने मोहीम राबवून परिसर अतिक्रमणमुक्त केला. मात्र यात सातत्य राखण्याबरोबरच येत्या पंधरा दिवसांत पुन्हा या मोहिमेचा आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.
शहरातील व्यापारी पेठेत दररोज शेकडो कोटींची उलाढाल होत असून, मात्र सीबीएस, शिवाजी रोड, सराफ बाजार, रविवार कारंजा, बोहोरपट्टी, धुमाळ पॉइंट ते दहीपूल, एम. जी. रोड या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने ग्राहकांना पायी चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे या परिसरात खरेदीसाठी येण्यास लोक कंटाळा करू लागल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार सराफ असोसिएशन व कापड विक्रेत्यांनी गुरुवारी (दि.२७) महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन केली. या भागातील अतिक्रमणाचा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा असे साकडे घातले. यावेळी आयुक्तांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे तसेच विभागीय अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्या. अतिक्रमण मोहिमेत सातत्य असावे तसेच दररोज त्याबाबतचा अहवाल आपल्याला सादर केला जावा असे आदेश दिले.