मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या पुनर्वसनाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:47 AM2018-08-31T00:47:03+5:302018-08-31T00:48:24+5:30
त्र्यंबकेश्वर : मेटघर किल्ला ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे लवकरच सादर करु असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी गुरूवारी सांगितले.
त्र्यंबकेश्वर : मेटघर किल्ला ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे लवकरच सादर करु असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी गुरूवारी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी आमदार सौ.निर्मला गावित, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, माजी जि.प.उपाध्यक्ष संपतराव सकाळे, योगेश चोथे, भगवान मधे, वनविभाग अधिकारी कैलास अहिरे, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
यावेळी आ.निर्मला गावित यांनी सांगितले की, मेटघर किल्ला ग्रामपंचायत ही संपूर्ण ब्रम्हगिरी व गंगाव्दार पर्वताच्या खाली वसलेली वाडी आहे. या मध्ये ६ मेटा येतात. अत्यंत धोकादायक परिस्थितीत या वाड्या वास्तव्य करीत असतात. उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.तसेच दररोज ग्रामस्थांना ४ किलोमीटर डोंगराची चढण उतरण करावी लागते. येथील आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इतर ग्रामपंचायतींच्या जागेत या आदिवासी बांधवांचे पुनवर्सन करावे अशी मागणी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे यांनी येथील समस्यांचा पाढा वाचला. लोक अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहत असून त्यांना रस्ते, आरोग्य ,शिक्षण, दळण वळण या सुविधांपासून वंचित असल्याचे नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी मेटघर किल्ला ग्रामपंचायतीचा प्रश्न सोडविण्यासाठी वनविभाग अन्य ग्रामपंचायतींच्या जागेत व शासकीय जागांची तपासणी करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला देऊन आ.गावित यांनी सुचविलेल्या प्रस्तावावर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या ठिकाणी ग्रामस्थांचे पुनर्वसन होईल त्याठिकाणी रस्ते, लाईट, दवाखाना, शाळा, आरोग्य या सर्व मूलभूत सुविधा देण्यात येतील. तसेच यासाठी निधीची कुठलीही कमतरता भासणार नाही. यांची ग्वाही दिली.
तसेच महादरवाजा मेटेकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश वनविभागला व प्रशासनाला जिल्हाधिकाºयांनी दिले. यावेळी महादरवाजा ग्रामस्थ संपत चहाळे यांनी आमचे पुनर्वसन करतांना सर्व मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे अशी मागणी केली. यावेळी रतन बदादे, विष्णू बदादे अजित सकाळे, ज्ञानेश्वर महाले, ग्रामसेवक पवार, आदिंसह अंजनेरी, पेगलवाडी, तळेगाव (त्र्यंबक), कोजुर्ली, पहिणे येथील तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.आमदारांकडून दखल४ महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे यांनी मेटघर किल्ला अंतर्गत महादरवाजा मेटला भेट दिली होती. त्यावेळी तेथील भीषण वास्तव समोर आले. ग्रामस्थ दररोज ४ किलोमीटर डोंगराची चढण उतरण करतात तसेच उन्हाळ्यात यात पाण्यासाठी २ किलोमीटर डोंगर उतरु न येतात, आरोग्य समस्या शिक्षण समस्या रस्ते हे सर्वच मूलभूत प्रश्नांपासून वंचित आहे. सदर समस्यांबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. तसेच आमदार निर्मला गावित यांनाही या समस्यांची माहिती देण्यात आली. आ.गावित यांनी सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना समस्यांबाबत तात्काळ बैठक घेण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी बैठकीचे आयोजन करु न समस्याग्रस्त मेटघर किल्ल्याचा पुनवर्सनाचा प्रश्न हाती घेतला आहे.