मेटकावरा-हेदपाडा रस्त्यावर दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:54+5:302021-07-29T04:14:54+5:30
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोंबिलटेक मेटकावरा-हेदपाडा रस्त्यावर अतिपावसामुळे दरड कोसळून माती थेट रस्त्यावर वाहून आल्याने रहदारीला अडथळा निर्माण ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोंबिलटेक मेटकावरा-हेदपाडा रस्त्यावर अतिपावसामुळे दरड कोसळून माती थेट रस्त्यावर वाहून आल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या रस्त्याची पाच वर्षे दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार व प्रशासनाची असताना कुठल्याही प्रकारची दुरुस्ती झाली नाही. गावकऱ्यांनी रस्त्याच्या कडेच्या चाऱ्या काढण्याची मागणी केली असता, संबंधित ठेकेदार व प्रशासनाने त्याला केराची टोपली दाखविली आहे. ऐन पावसाळ्यात डोंगराची माती-दगड थेट रस्त्यावर येऊन रस्त्याचे मोठे नुकसान झाले. याबाबतची माहिती महसूल विभागाला कळताच, तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत सर्व अधिकारी यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, प्रांताधिकारी तेजस चव्हाण हेही घटनास्थळी पोहोचले. उशिरापर्यंत जेसीबी व ट्रॅक्टर, तसेच ग्रामस्थांच्या मदतीने दरड हटवण्यात आली. यावेळी घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे फडांगळे, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी पल्लवी जाधव, संजय पाटील यांसह इतर तलाठी, महसूल विभागाचे कर्मचारी, तसेच गावकरी उपस्थित होते.
इन्फो
साधनसुविधांचा अभाव
अतिदुर्गम भागातील घटनास्थळाची माहिती बचाव पथकांना मिळविण्यासाठी दिशादर्शक नकाशा व पर्यायी रस्त्याची माहिती नियंत्रण कक्षात तत्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शोध व बचाव पथक यांच्यासाठी टॉर्च, रोप, फावडे व इतर साहित्य पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस घटना घडली, तर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी मदत कार्य करण्यासाठी छोट्या पोर्टेबल जनरेटर सेटची गरज आहे. या साऱ्या साधन सुविधांचा अभाव आहे.
फोटो- २८ हेदपाडा दरड-१
280721\28nsk_12_28072021_13.jpg
फोटो- २८ हेदपाडा दरड-१