म्हाळोबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

By admin | Published: February 18, 2016 11:14 PM2016-02-18T23:14:39+5:302016-02-18T23:16:38+5:30

दोडी येथे रविवारपासून यात्रा : समितीची स्थापना

Mhaloba Yatantu preparation is complete | म्हाळोबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

म्हाळोबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

Next

नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत व सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रविवार (दि. २१) पासून यात्रेस प्रारंभ होत आहे.
म्हाळोबा महाराज यात्रा समितीची नुकतीच बैठक होऊन उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हाळोबा महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. बोकडबळीमुळे राज्यभर सदरची यात्रा ओळखली जाते. म्हाळोबा महाराजांना मानणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. गेल्या चार वर्षांपासून मंदिराचे लोकवर्गणीतून जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. सदर काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या सभामंडपात आकर्षक मार्बल्स बसविण्यात आली असून, लांबी वाढविण्यात आली आहे. यामुळे म्हाळोबा महाराजांचे मंदिर आकर्षकरीत्या सजले आहे.
यात्रेव्यतिरिक्तही वर्षभर म्हाळोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासाठी मंदिर परिसर
स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरास रंगरंगोटी देण्यात आली असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
तीनदिवसीय यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावून नवसपूर्तीसाठी बोकडबळी देत असतात. रविवारी रात्री भाविक गंगेचे पाणी आणून सोमवारी पहाटे म्हाळोबा महाराजांना अभ्यंगस्रान घालणार आहेत. रविवारी सकाळी देवाच्या मुखवट्याची व पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत रंगीबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोल व व्हलाराच्या सनईवाद्यात निघणारी मिरवणूक आकर्षक ठरणार आहे. यावेळी भक्तगण धनगर गजनृत्य सादर करुन काठीमहाल नाचवित नेणार आहे. महिलांच्या हस्ते देवाची व काठीमहालाची पूजा करतात. त्यानंतर मुखवटा स्थापना करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी स्थानिक भगत असणारे शिंदे मंडळी नवसाचे बोकडबळी देतील.
सोमवारी सकाळी माघ पौर्णिमेच्या दिवशी गादीचे व मुखवट्याचे पूजन केले जाणार आहे. दिवसभर मंदिरात होमहवन, आरती व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. वर्षभर म्हाळोबा महाराजांना जे भाविक नवस कबूल करतात ते बोकडबळीसाठी येथे येतात. यादिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व बोकडबळी दिले जातात. नवसपूर्तीसाठी महिला गळ खेळणे व लोटांगण घेणे आदि कार्यक्रम करतात. तळेगाव येथील भक्तगणांना गादीच्या देवाचा व काठीचा मान दिला जातो.
राज्यभरातून येथे काठ्या येतात. पाऊल टेकडीपासून मंदिरापर्यंत काठीची देवास भेट घडविली जाते. त्यानंतर रात्रभर भगत मंडळी डफाच्या तालावर देवाची गाणी म्हणतात. मंगळवारी दुपारी तीन वाजता नामवंत मल्लांची कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातात. यात्रेत्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे दुकाने दाखल होण्यास सुुरुवात झाली आहे.
यात्रोत्सव पार पाडण्यासाठी समितीचे पाराजी शिंदे, भारत शिंदे, बाळासाहेब शिंदे, कारभारी शिंदे, भारत शिंदे, कचरू शिंदे, रतन शिंदे, जानकू शिंदे, रभाजी जाधव, साहेबराव शिंदे, शिवाजी शिंदे, रायभान शिंदे, काशीनाथ शिंदे, मल्हारी शिंदे, सुभाष शिंदे, चंद्रभान जाधव, किसन शिंदे, बापू शिंदे, माधव शिंदे, मारुती शिंदे आदिंसह यात्रा उत्सव समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)
गुणगौरव सोहळा
नाशिक : लेखा व कोषागार कर्मचारी कल्याण समितीच्या वतीने लेखाकोश दिनानिमित्त लेखा व कोषागरे कार्यालय परिवारातील अधिकारी, कर्मचारी यांच्या ६० पाल्यांचा शैक्षणिक व इतर क्षेत्रात नैपुण्य मिळविल्याबद्दल नुकताच गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक पंडितराव गवळी, बी. जी. वाघ, सुभाषचंद्र येवले, बाळासाहेब घोरपडे आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य मिळविलेल्या व सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहसंचालक उत्तमराव कांबळे, बोधीकिरण सोनकांबळे, स्वरांजली पिंगळे, देवराव म्हस्के, तहसीलदार कैलास कडलग गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कोषागार कार्यालयातील कामगार तसेच अधिकारी उपस्थित होते. अनेकांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Mhaloba Yatantu preparation is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.