म्हैसमाळमध्ये गावकऱ्यांनी केले पाण्याचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 04:17 PM2020-12-18T16:17:25+5:302020-12-18T16:18:33+5:30
पेठ : तीव्र दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ गावात सामाजिक संघटनेच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात पाणी पोहोचल्याने गावकऱ्यांनी वाजत गाजत तर महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नृत्य करत जल्लोषात स्वागत केले.
नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव मागील वर्षी दुष्काळासाठी देशभरात चर्चेत आले होते. समाजमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या वाचून सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेने या गावाचा पाणीप्रश्न सोडवण्याचे ठरवले. त्यानंतर दीड वर्ष एसएनएफ टीमच्या अथक परिश्रमातून म्हैसमाळ गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यात यश आले आणि गुरुवारी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरिक्षक राजेश लोखंडे, भूगर्भशास्रज्ञ डॉ. जयदीप निकम, प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदचे माजी सदस्य गोपाळ धूम, प्रशांत बच्छाव, महेश टोपले, देवदत्त चौधरी, जयदीप गायकवाड, देवीदास कामडी, मनोहर जाधव, दिलीप महाले, यशवंतराव धूम, संदीप डगळे आदी उपस्थित होते.
पाण्यामुळे सुटणार सामाजिक प्रश्न
एसएनएफच्या पाण्याच्या बदल्यात वृक्षसंवर्धन या योनजेंतर्गत गावात वृक्षारोपण करण्यात आले. या रोपांची निगा राखणे ते वाढविण्याची जबादारी गावकऱ्यांनी आनंदाने स्वीकारली. यासोबतच गावात पाणी आल्याने गाव हगणदारीमुक्त करण्याचा संकल्पही गावकऱ्यांनी केला. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले, की पाण्याच्या अभावामुळे आमच्या गावातील मुलांशी लग्न करायला मुली तयार होत नव्हत्या. गेल्या काही दिवसांत सुटलेल्या पाणीप्रश्नामुळे आता तरुणांची लग्नेही व्हायला सुरुवात झाली आहे.