म्हसोबा महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:15 AM2019-03-12T00:15:00+5:302019-03-12T00:15:49+5:30
देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, बुधवारी (दि. १३) यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
नाशिकरोड : देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, बुधवारी (दि. १३) यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. देवळालीगाव परिसराचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून मंडप टाकून व विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे. यात्रोत्सवानिमित्त परिसरात विविध वस्तू विक्रीची, खाद्यपदार्थ आदींची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे.
देवळालीगाव पंच कमिटीकडून यात्रोत्सवाची सुरू असलेली तयारी पूर्णत्वास आली आहे. बुधवारी यात्रोत्सवाच्या दिवशी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत बिटकोकडून विहितगावकडे जाणारी व तेथून येणारी वाहतूक सत्कार पॉर्इंट, सुभाषरोड, मालधक्कारोडमार्गे वळविण्यात येणार आहे. यात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंच कमिटीने केले आहे.
रथातून मिरवणूक
बुधवारी (दि. १३) यात्रोत्सवास प्रारंभ होणार असून, पहाटे मूर्तीला अभिषेक, सत्यनारायण पूजा, मांडव डहाळे मिरवणूक झाल्यानंतर महाआरती होणार आहे. सायंकाळी श्री म्हसोबा महाराज प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे, तर गुरूवारी दुपारी देवळालीगावातील कुस्ती मैदानात यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल होणार आहे.