म्हसरूळला दोन मोटारींची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:16 AM2019-06-16T01:16:56+5:302019-06-16T01:17:11+5:30
शहर व परिसरात मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास अज्ञात गावगुंडांकडून घरांसमोर उभी असलेली वाहने लक्ष्य केली जात आहेत. म्हसरूळ परिसरात अशाच प्रकारे दोन मोटारींच्या काचा फोडून गावगुंडांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शहर व परिसरात मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास अज्ञात गावगुंडांकडून घरांसमोर उभी असलेली वाहने लक्ष्य केली जात आहेत. म्हसरूळ परिसरात अशाच प्रकारे दोन मोटारींच्या काचा फोडून गावगुंडांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर व परिसरात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून, नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून कोम्बिंग, मिशन आॅल आउट यांसारख्या मोहिमा राबविल्या जात असल्या तरी गुन्हेगारी अद्याप नियंत्रणात आलेली नाही. नाकाबंदीमधून केवळ हेल्मेट परिधान न करणाऱ्या सर्वसामान्यांना पोलिसांकडून अडविले जात असून, त्यांची झाडाझडती केली जात आहे; मात्र शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दिंडोरीरोडवरील सावरकर उद्यानाजवळील श्री गणराज बंगल्याबाहेर उभ्या असलेली अक्षय प्रकाश धात्रक यांची स्कॉर्पिओ (एमएच १५, बीडी ७७८१) व प्रशांत श्यामराव जोशी यांची फिगो (एमएच १५, ईबी ७६२६) ही वाहने अज्ञात इसमांनी दगडफेक करून शनिवारी (दि.१५) मध्यरात्री फोडली. दोन्ही वाहनांच्या समोरच्या काचा फुटल्या आहेत. सकाळी जेव्हा वाहनमालक झोपेतून उठले तेव्हा त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ सदर घटना म्हसरूळ पोलिसांना कळविली. या प्रकरणी वाहनमालकांनी म्हसरूळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांची वाहने दारापुढे तसेच रस्त्यांवरही सुरक्षित नसून चार ते पाच दिवसांपूर्वी सरकारवाडा, मुंबई नाका, गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गजबजलेल्या ठिकाणी उभ्या असलेल्या मोटारींच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले होते. त्यापूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत नारायणबापूनगर परिसरात चोरट्यांनी मध्यत्ररात्री धुडगूस घालत रहिवाशांच्या सात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली होती.