म्हसरूळला साडेतीन लाखांची घरफोडी
By admin | Published: September 2, 2016 01:12 AM2016-09-02T01:12:22+5:302016-09-02T01:13:00+5:30
कलानगर येथील घटना : सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील कलानगर येथील बंद सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोने-चांदीचे दागिने तसेच अडीच लाख रु पये रोख असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
काल मंगळवारी दुपारच्या सुमाराला ही घटना घडली. याबाबत सीताराम निकम यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निकम यांचा दिंडोरी रोडवरील कलानगर परिसरात छावाशौर्य इमारतीत फ्लॅट आहे. सुरगाणा येथील एका संस्थेत निकम पती-पत्नी शिक्षक असून, दोन दिवस सुट्या असल्याने निकम दाम्पत्य कलानगर येथे आले होते. येताना त्यांनी कदम नामक महिलेला फ्लॅट घेण्यासाठी आणलेले अडीच लाख रु पये व निकम यांच्या पत्नीचे सात तोळे सोने-चांदीचे दागिने आणले होते. दुपारी चार वाजता निकम हे सदनिकेत आले व तेथून कामानिमित्त चांदवड तालुक्यात नातेवाइकांकडे गेले होते. त्याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातून अडीच लाख रुपयांची रोकड व सात तोळे सोने-चांदीचे दागिने असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. रात्री निकम हे घरी परतले असता फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. आत प्रवेश केला असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यावरून घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेत घरफोडी झाल्याची तक्रार दाखल केली. (वार्ताहर)