म्हसरूळला दोघा भावंडांवर धारदार शस्त्राने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:21 AM2018-10-09T01:21:28+5:302018-10-09T01:21:47+5:30
पूर्ववैमनस्यातून दोघा भावंडांसह त्यांच्या आईस बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास म्हसरूळ शिवारातील स्नेहनगरमध्ये घडली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, संशयित फरार झाले आहेत़
पंचवटी : पूर्ववैमनस्यातून दोघा भावंडांसह त्यांच्या आईस बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास म्हसरूळ शिवारातील स्नेहनगरमध्ये घडली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, संशयित फरार झाले आहेत़ म्हसरूळ पोलिसांनी दिलेली माहितीनुसार स्नेहनगर येथील प्रीती पार्क अपार्टमेंटमधील सुजित भास्कर पगारे हा रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ते पाववडा आणण्यासाठी गेला होता. भाऊ मंगेश पगारे याच्याशी बोलत असताना दोन दुचाकीवर संशयित पोलीसपुत्र प्रवीण काकड, संदीप कदम, अमोल काळे ऊर्फ फल्ले व पुष्पक शिंगाडे असे चौघेजण आले़ त्यांनी तू आमच्या बाल्याभाईला का मारले असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करून धारदार शस्त्राने वार केले.
यानंतर पगारे भावंडे घरी गेले असता संशयितांनी घरात घुसून आई-वडिलांना शिवीगाळ केली तसेच पगारे यांची आई सुनंदा यांनाही जबर मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता़ या घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, शांताराम पाटील, सुभाषचंद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली होती़
मोरे याच्यावरून वाद
शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या निखिल ऊर्फ बाल्या मोरे या सराईत गुन्हेगाराचा गेल्यावर्षी पूर्ववैमनस्यातून गतवर्षी खून केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दोन गटांत वाद सुरू झाले असून, काही दिवसांपूर्वी म्हसरूळ शिवारात हाणामारी, शस्त्राने वार अशा घटना घडलेल्या आहेत़
‘त्या’ पोलीसपुत्राची दहशत
पोलिसांच्या नाकीनव आणणारा पोलीसपुत्र संशयित प्रवीण काकड याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत़ या पोलीस पुत्राकडून परिसरात एखाद्यास मारहाण, शस्त्र घेऊन फिरणे, दहशत माजविण्यासारखे प्रकार करीत असल्याने म्हसरूळ पोलीस कर्मचारी मेटाकुटीला आले.