मिग-२९चे होणार आधुनिकीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 05:32 AM2019-09-29T05:32:07+5:302019-09-29T05:32:33+5:30
वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपरसोनिक मिग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे आधुनिकीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.
नाशिक : वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपरसोनिक मिग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे आधुनिकीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. ससाणा पक्षाप्रमाणे आकाशात उंच भरारी घेतानाही लक्षावर नजर ठेवून अचूक मारा करीत शत्रूला टिपण्याची क्षमता असलेल्या या ऐतिहासिक विमानाची वायुदलात ‘बाज’अशी ओळख असून, या विमानाने शनिवारी (दि.२८) ओझरच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वी आकाशात चित्तथराराक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
वायुदलाच्या २८ स्क्वॉड्रनच्या मिग- २९ सुपरसोनिक विमानाने ग्रुप कैप्टन जे. एस. पटेल यांच्या नेतृत्वाखाली अखेरचे उड्डाण केल्यानंतर सादर केलेल्या कवायतीनी लक्ष वेधून घेतले. हे विमान ११ बीआरडी येथे देखभाल दुरुस्तीसह आधुनिकीकरणासाठी आणण्यात आले आहे. याठिकाणी मिग -२९ विमानांची कार्यक्षमता सुधारण्यासोबतच त्यांना अद्ययावत करून पुन्हा देशसेवेसाठी सज्ज केले जाणार आहे.