रोजगारासाठी आदिवासी बांधवांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:31 PM2019-03-13T13:31:10+5:302019-03-13T13:31:20+5:30
खमताणे : आदिवासीबहुल बागलाण तालुक्यात रोजगार देणारी रोहयो योजना कागदावरच राहिली आहे. अमुक एक योजना आहे व यासाठी कोणाकडे कसा, कुठे अर्ज करायचा, याची माहितीच नसल्याने आदिवासींवर रोजगारासाठी शेजारचे जिल्हे अथवा गुजरातमध्ये स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.
खमताणे : आदिवासीबहुल बागलाण तालुक्यात रोजगार देणारी रोहयो योजना कागदावरच राहिली आहे. अमुक एक योजना आहे व यासाठी कोणाकडे कसा, कुठे अर्ज करायचा, याची माहितीच नसल्याने आदिवासींवर रोजगारासाठी शेजारचे जिल्हे अथवा गुजरातमध्ये स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे कागदोपत्री कामावर भरपूर खर्च होऊन अधिकारी व ठेकेदारांचे खिसे भरले जात आहे. वीज पाणी, आरोग्य, शिक्षण या पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार हा ज्वलंत प्रश्न वर्षानुवर्षे भेडसावत आहे. परिसरातील गोरगरीब जनतेच्या हाताला काम तर मिळत नाहीच परंतु त्याच हाताने भीक मागायची वेळ आली आहे. आदिवासी समाज कष्ट करून जगणारा समाज असल्याने शासनाच्या भरोशावर न राहता तो स्वत:च रोजगार कसा मिळेल, यासाठी गावोगाव भटकतो. वीटभट्टी, इमारत बांधकाम रेती काढणे यासारख्या मिळेल त्या कामाच्या शोधात कुटुंबासह फिरतो व फक्त जगण्यापुरतीच मजुरी पदरात पडली तरी समाधानी राहतो. रोजगाराच्या या भटकंतीमुळेच साल्हेर, मुल्हेर नवेगाव यासारख्या आदिवासी बहुल तालुक्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न वर्षातील सात ते आठ महिने रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागल्याने मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्न गरोदर मातांचे व कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण देखील या भागातच जास्त पहावयास मिळते.