रोजगारासाठी आदिवासींचे भर उन्हात नाशिक शहराकडे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 07:00 PM2018-04-02T19:00:03+5:302018-04-02T19:00:03+5:30
पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी धरणाचा परिसर असलेल्या गिरणारे गाव तसे कृषिसमृद्ध आहे.
गिरणारे : वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला असून, शेती व शेती पूरक जोडधंदेही मंदावल्याने आदिवासींची शहरी भागासह जवळील खेड्यांच्या दिशेने भटकंती वाढत आहे. नाशिक पासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या गिरणारे गावातील मजुरांच्या नाक्यावर आदिवासींचा वाढता ठिय्या त्याचे बोलके उदाहरण ठरत आहे.
पावसाळ्याची चार महिने जिल्ह्यातील आदिवासी भाग जणू नंदनवनासारखाच भासतो. सर्वत्र भात, नागली, खुरसणी, भुईमूग यांसारख्या पिकांचे उत्पादन जोरात घेतले जाते. त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न निर्माण होत नाही. आदिवासींच्या हाताला कामही मिळते आणि उत्पादनाचे प्रमाणही वाढलेले असते. पाणीटंचाईची समस्याही सुटलेली असते. त्यामुळे आदिवासी लोक पावसाळ्यात उंबरा ओलांडत नाही; मात्र उन्हाळ्यात परिस्थिती याउलट होते. पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी धरणाचा परिसर असलेल्या गिरणारे गाव तसे कृषिसमृद्ध आहे. गिरणारे गाव आदिवासी गाव, पाड्यांपासून जसे तासाभराच्या अंतरावर आहे, तसे या गावातून नाशिक शहरात येण्यासाठी महामंडळाची बससेवेसह खासगी वाहतूक सेवाही उपलब्ध असल्यामुळे शहरासोबत हे गाव जोडलेले आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. गिरणारे शिवाराला द्राक्ष बागायती शेती लाभलेली आहे. यामुळे या भागात द्राक्ष उत्पादकांची संख्या आहे. तसेच द्राक्ष काढणीनंतर मणुका तयार करणारे विविध व्यावसायिकांचाही येथे मुक्का दिसून येतो. यामुळे या भागात मजुरांची नेहमीच गरज भासते. काबाडकष्टाची कामे करण्यासाठी आदिवासी भागातील लोकांची मोठी मदत होते. एकूणच मजुरीसाठी गिरणारे भागात सध्या आदिवासींचा राबता दिसून येत आहे.
--
सरकारी उदासीनतेची ‘मनरेगा’
आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दुर्गम आदिवासी गाव, पाड्यांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विविध विकासकामे राबविली जातात; मात्र तरीदेखील तुटपुंजे मजुरी, अल्प विकासकामांमुळे ‘मनरेगा’मध्ये आदिवासींचे फारसे ‘मन’ रमत नाही. नाईलाजास्तव भटकंतीची वेळ ओढावते. त्यातच सरकारी अनास्थेचेही भर पडते. कारण अनास्थेमुळे विकासकामांना प्रत्यक्ष ‘मुहूर्त’ मिळण्यास विलंब होतो. परिणामी आदिवासींना ‘मनरेगा’मध्ये हाताला काम कमी प्रतीक्षा अधिक करावी लागते.