गाजावाजा न करता कार्यालयाचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:30 AM2019-07-01T00:30:55+5:302019-07-01T00:31:35+5:30
भगूर नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे स्वा. वीर सावरकर सभागृह इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले.
भगूर : भगूर नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे स्वा. वीर सावरकर सभागृह इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले. कुठलाही गाजावाजा न करता कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भगूर नगरपालिकेची स्थापना सन १९२५ मध्ये झाली. त्यावेळी मुख्य कार्यालय लक्ष्मीनारायण रोडवरील कौलारू इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होते. या इमारतीचा कालावधी संपल्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष अॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी इंदिरा गांधी चौकातील नवीन दोन इमारतींपैकी इंदिरा व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर सन १९९० साली नवीन कार्यालय स्थापन केले ते आजपर्यंत सुरू होते. दुसऱ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वीर सावरकर सभागृह हॉल बांधून तो समारंभासाठी भाड्याने दिला जात असताना अचानक या ठिकाणी भगूर नगरपालिका कार्यालय सुरू करण्यात येऊन त्याठिकाणी विविध विभागांचे कामकाज सुरू करण्यात आले. त्यात प्रामुख्याने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, कार्यालयीन अधीक्षक अशांची कॅबिन तयार करण्यात आले आहेत. या नवीन कार्यालय सुरू करण्याविषयी नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना नागरिकांना दिली नाही किंबहुना कोणताही गाजावाजा केला नाही. त्यामुळे नागरिकांना त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, या संदर्भात माजी नगराध्यक्ष अॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी, जुन्या इमारतीतील कार्यालय मजबूत असतानाही नगरपालिका कार्यालय बेकायदेशीरपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. गोरगरिबांच्या लग्नकार्य व इतर कार्यक्रमासाठी एकमेव सावरकर हॉल होता तो बंद करून नगरपालिकेचे स्वत:चे उत्पन्न बुडविले आहे.