रोजगाराअभावी मजुरांचे स्थलांतर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:11 AM2018-03-30T00:11:12+5:302018-03-30T00:11:12+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात शासकीय योजनेची कामे करणाऱ्या वेगवेगळ्या तीन यंत्रणा कार्यरत असताना मजुरांना रोजगाराअभावी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गावांमध्ये रोजगाराअभावी स्थलांतर होऊ नये व प्रत्येक हाताला काम मिळावे, या हेतुने रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना तालुक्यात मजुरांना कामच नसल्यामुळे दररोज मजुरांचे स्थलांतर होत आहे.

एक तर शेतीची कामे संपली आहेत. हाताला काम नाही. गावात कामे नाहीत. रोजगार हमीची कामे नाहीत. त्यासाठी अन्यत्र स्थलांतर करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तालुका कृषी विभाग, पंचायत समिती व वनविभाग त्र्यंबकेश्वर व हरसूल आदी शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. त्र्यंबक तालुका हा ९० टक्के आदिवासी तालुका असल्याकारणाने इथे रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत. रोजगार हमीच्या कामांची गरज असताना येथील लोकांना काम देण्यास पंचायत समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे. मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात नाशिक, सातपूर, तसेच गुजरात राज्यात होत आहे. लवकरात लवकर मजुरांना कामे द्यावे अन्यथा तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी तसेच मजुरांना घेऊन पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख समाधान बोडके यांनी यावेळी दिला. याप्रसंगी कृषी अधिकारी सुनील विटनोर, कृषी विस्तार अधिकारी स्वाती भिसे तर शिष्टमंडळात रावसाहेब कोठुळे, गोपाळ उघडे, जयराम मोंढे, शरद महाले, देवीदास पगार, निवृत्ती लिलके, उत्तम लिलके, रोजगार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवराम उघडे आदी उपस्थित होते.कामे सुरूत्र्यंबक पंचायत समितीमध्ये दगडी बांधकामे १२, रस्त्याचे १, विहिरींची ७, घरकुलांची २२७ कामे सुरू आहेत तर सेल्फवर असलेली ६८५ कामे आहेत. वनविभागाचे फक्त अंबोली येथे रोपवाटिका लावण्याचे काम सुरू आहे, तर कृषी विभागाची पूर्वीची कामे संपली असून, आता १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षात कामे सुरू होतील असे तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.