उंबरमाळ, घोटविहिरा येथील नागरिकांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 01:54 AM2022-07-16T01:54:39+5:302022-07-16T01:55:01+5:30
पेठ तालुक्यातील घोटविहिरा व उंबरमाळ येथील शंभर मीटर रस्त्याला तडे गेले असून, माती ढासळण्यासह झाडेही उन्मळून पडल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी दिल्यानंतर त्यांचे शुक्रवारी (दि.१५) स्थलांतर करण्यात आले.
नाशिक : पेठ तालुक्यातील घोटविहिरा व उंबरमाळ येथील शंभर मीटर रस्त्याला तडे गेले असून, माती ढासळण्यासह झाडेही उन्मळून पडल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी दिल्यानंतर त्यांचे शुक्रवारी (दि.१५) स्थलांतर करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पेठ तालुक्याला अतिवृष्टीने झोडपून काढले असून, ३०० मिलीमीटरच्या पुढे विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाच्या संततधारेमुळे घोट विहिरा, उंबरमाळ येथे रस्त्याला तडे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भातील माहिती तहसीलदार संदीप भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शुक्रवारी (दि.१५) पेठला भेट दिली असून, तेथे राहणाऱ्या रहिवासींशी चर्चा करून त्यांचे तत्काळ स्थलांतर करून त्यांना दिलासा दिला आहे. घोटविहिरा व उंबरमाळ गावाला लागून असलेल्या दरीच्या खालच्या भागात माती ढासळल्याने रस्त्याला तडे जाणे व झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्याने त्या भागात वास्तव्यास असलेल्या दहा कुटुंबांचे घोटविहिरा गावातील रिकामी घरे, समाजमंदिरात व खरपडी आश्रमशाळेत स्थलांतर करताना त्यांची भोजनाची व्यवस्था करून तेथील नागरिकांना व कुटुंबीयांना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधून दिलासा दिला आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, तहसीलदार संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक वारुळे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार व गावातील ग्रामस्थ उपस्थितीत होते.