पोलीस आयुक्तालयाचे स्थलांतर
By admin | Published: October 9, 2014 12:49 AM2014-10-09T00:49:01+5:302014-10-09T00:49:20+5:30
पोलीस आयुक्तालयाचे स्थलांतर
नाशिक : सुमारे पंचवीस वर्षांपासून शहरातील कायदा सुव्यवस्थेचे नियोजन करणारे पोलीस आयुक्तालय बुधवारी गंगापूररोडवरील स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित झाले़ सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर आधारित असलेली ही तीन मजली अद्ययावत वास्तू उत्तर महाराष्ट्रात पहिलीच इमारत आहे़ प्रथम इमारतीचे सुरू असलेले काम व त्यानंतर आचारसंहिता यामुळे कोणताही गाजावाजा वा मंत्र्यांच्या उपस्थितीत या इमारतीचा औपचारिक उद्घाटन सोहळा होऊ शकला नाही़
या नवीन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत तळमजल्यावर हॉटेल, विविध प्रकारच्या परवानग्या देणारा ‘एक खिडकी योजनेचा कक्ष’ आहे़ आधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत व पर्यावरणपूरक असलेली उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पोलीस आयुक्तालयाची ही पहिलीच इमारत आहे़
या इमारतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या ग्रीन बिल्डिंग संकल्पनेमुळे विजेची मोठी बचत होते़ पोलीस आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच या इमारतीस नऊ कोटींचा निधी मंजूर होऊन त्याचे कामही पूर्णत्वास आले़
इमारतीचे बांधकाम ५० हजार चौरस फुटांचे असून, तळमजला, त्यावर दोन पूर्ण मजले व तिसरा अर्धा मजला अशी रचना आहे़ तळमजल्यावरच हॉटेल व इतर परवानग्यांसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी एक खिडकी योजना कक्ष, चारित्र्य पडताळणी, विशेष शाखा विभाग, नियंत्रण कक्ष, पासपोर्ट चौकशी, उपाहारगृह, प्रवेशद्वारावर अपंग, वृद्धांसाठी रॅम्प आणि आत दोन मजल्यांवर जिना व लिफ्टची सोय करण्यात आली आहे़ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आयुक्त, त्यांचे स्वीय सहायक व इतर दोन उपआयुक्तांचे कक्ष आहेत़ नागरिकांसाठी अभ्यागत कक्ष व ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृहदेखील आहे़
दुसऱ्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालय, मंत्रालयीन कर्मचारी, पोलीस कल्याण निधी कक्ष, गुन्हे शोध पथक कक्ष, तर तिसऱ्या मजल्यावर रेकॉर्ड रूम आहे़ लवकरच या इमारतीच्या आवारात बिनतारी संदेश व सॅटेलाईट यंत्रणाही सुरू करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)