ढोलबारेत पाण्यासाठी ग्रामस्थांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:38 AM2019-05-26T00:38:53+5:302019-05-26T00:39:09+5:30
बागलाणमधील अभूतपूर्व दुष्काळाचे वास्तव चित्राने सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा असल्याचे दिसून येत आहे. अन्नपाण्याच्या शोधार्थ ढोलबारे गाव सहा महिन्यांपासून बंद असून, दुष्काळाच्या झळा सोसत बागलाण तालुका पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे.
सटाणा : बागलाणमधील अभूतपूर्व दुष्काळाचे वास्तव चित्राने सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा असल्याचे दिसून येत आहे. अन्नपाण्याच्या शोधार्थ ढोलबारे गाव सहा महिन्यांपासून बंद असून, दुष्काळाच्या झळा सोसत बागलाण तालुका पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. तालुक्यातील ढोलबारे येथील दीडशे घरांपैकी ऐंशी घरांतील रहिवाशी स्वत:च्या पोटापाण्यासह जनावरांच्या चाऱ्याच्या शोधार्थ गेल्या सहा महिन्यांपासून वणवण भटकंतीला निघाल्याने गाव बंद असल्याचे भयावह चित्र बघायला मिळत आहे. पाण्यासाठी घरे बंद करून भटकंतीला निघालेले हे गाव बागलाण तालुक्यातील अभूतपूर्व दुष्काळाचे वास्तव सांगणारे चित्र आहे.
सटाणा शहरापासून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे शिर्डी साक्री या राष्ट्रीय महामार्गावरील छोट्याशा टेकडीवर वसलेले ढोलबारे हे बाराशे लोकवस्तीचे गाव. या गावातील रहिवाशांचा शेती, मजुरी आणि मेंढपाळ हा मुख्य व्यवसाय आहे.
पाच वर्षांपासून पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली...
पाऊस पडेल तर शेती. आणि शेती पिकली तर मजुरी मिळेल. पीक चांगले आले तर जनावरांना चारा मिळेल, असे निसर्गाचे चक्र. परंतु ढोलबारे गावची भौगोलिक रचना अशी आहे की, गावाचा शिवाराच मुरमाड, खडकाळ आहे. त्यामुळे पाऊस चांगला झाला तर शेती पिकेल. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईने डोके वर काढले. विहिरी आटल्याने दुष्काळाच्या झळा असह्य झाल्या आहेत. पाणीटंचाईमुळे माणसासह जनावरेही कासावीस झाली आहेत. स्वत:च्या पोटापाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाल्याने गावातील सुमारे ऐंशी कुटुंब घराला टाळे ठोकून चारा-पाण्याच्या शोधार्थ भटकंतीला निघाली आहेत. यामुळे डिसेंबर महिन्यापासून ढोलबारे गाव बंद आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर गाव उघडण्याची शक्यता आहे, असे भयावह चित्र बघायला मिळत आहे.
पाणी योजनांमध्ये भ्रष्टाचार
सहा वर्षांपूर्वी गावात सार्वजनिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. पाण्याचा शाश्वत स्रोत नसताना संबंधित ठेकेदाराने आधी पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले. त्यानंतर अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम केले. पाणी नसल्यामुळे टाकीत पाणीच पडले नाही. निकृष्ट दर्जाचे बांधकामामुळे योजना धूळ खात पडून आहे. शासनाचे लाखो रु पये पाण्यात गेले आहे.
एक टॅँकर भागवतोय तहान...
गावाच्या पूर्वेला आदिवासी वस्ती आहे. या वस्तीसाठी दहा हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र हे पाणी कमी पडत असल्याने पाणीटंचाई जैसे थे आहे. शासनाने परिसरात शौचालये दिली मात्र पाणी दिले नाही. त्यामुळे पाणीटंचाईमुळे हगणदारीमुक्त योजनेला तडा गेला आहे. टॅँकरच्या खेपा वाढवून मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पिण्यासाठी महिलावर्गाला भटकंती करावी लागत आहे.