ब्रिटिशकालीन वास्तूमधून पश्चिम वनविभागाचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:31+5:302021-07-20T04:11:31+5:30
ब्रिटिशकालीन अधिकारी वर्गाचे निवासस्थान अन् त्यावेळेच्या कामगारांच्या खोल्या, तसेच घोड्यांचे अस्तबल म्हणून विकसित करण्यात आलेली सध्याच्या पश्चिम, पूर्व वनविभागाची ...
ब्रिटिशकालीन अधिकारी वर्गाचे निवासस्थान अन् त्यावेळेच्या कामगारांच्या खोल्या, तसेच घोड्यांचे अस्तबल म्हणून विकसित करण्यात आलेली सध्याच्या पश्चिम, पूर्व वनविभागाची वास्तू इ.स.१९२० सालापूर्वीचे बांधकाम असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात. वनखाते हे ब्रिटिशकालीन खाते म्हणून आजही ओळखले जाते. या खात्याचे नाशिकचे रेंज कार्यालय १९२० साली ब्रिटिशांकडून हस्तांतरित करण्यात आले होते. वीटा, दगड मातीमधील हे बांधकाम काळानुरूप जीर्ण झाले असून, ठिकठिकाणी पडझड सुरू झाल्यामुळे नाशिक पश्चिम वनविभागाच्या प्रशासनाने हे कार्यालयात ‘वन भवन’ अस्तित्वात येईपर्यंत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.
उंटवाडी येथील विश्रामगृहाच्या आवारातील सभागृहात कार्यालयीन लिपिक वर्गाचे टेबल, तसेच पाठीमागील आवारात असलेल्या खोल्यांमध्ये वनक्षेत्रपाल, वनपाल, रेस्क्यू टीमचे कार्यालय विकसित करण्यात आले आहे, तसेच मुख्य विश्रामगृहाच्या तळमजल्यावर उपवनसंरक्षकांचे दालन विकसित करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावरील विश्रामखोल्या ‘जैसे-थे’ ठेवण्यात आल्या आहेत. सहायक वनसंरक्षकांचेही कार्यालयत नव्या जागेत स्थलांतरित केले जाणार आहे.
या जागेवर ‘वनभवन’ साकारण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. वनभवनाच्या एकाच इमारतीत पूर्व, पश्चिम प्रादेशिक वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय राहणार आहे. वनभवनाची अद्ययावत सुसज्ज वास्तू साकारण्याचा प्रस्ताव नव्याने मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
180721\034618nsk_41_18072021_13.jpg
वनविश्रामगृहातील वनपालांचे नवे कार्यालय