जाखोरी शिवारात दांपत्यावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 01:24 AM2020-01-18T01:24:47+5:302020-01-18T01:25:31+5:30
एक ते दीड वर्षांपासून जाखोरी शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत असताना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.
नाशिकरोड : एक ते दीड वर्षांपासून जाखोरी शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात
बिबट्याची दहशत असताना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शिंदे गावातील आलम शेख जखमी झाले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जाखोरी शिवारात गेल्या वर्षाभरात पाच ते सहा जणांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या असताना यात आणखी एका घटनेची भर पडली आहे.
शिंदे गावातील आलम सुभानभाई शेख व शमिन आलम
शेख पती-पत्नी दुचाकीवरून जाखोरीहून शिंदे गावाकडे जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेख
दांपत्य जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वर्षभरापासून जाखोरी ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार विनंती करूनही वनविभाग या परिसरात अपेक्षित खबरदारी घेत नसल्याने अशाप्रकारे नागरिकांवर बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार घडत आहे. परिसरातील नागरिकांचे शेतात येणे-जाणे अडचणीचे झाले असून, सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणेही कठीण झाले आहे.
परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. वनविभागतर्फे परिसरात लावलेला पिंजरा रिकामाच असल्याने अद्यापपर्यंत एकदाही बिबट्या पिंजरात आलेला नाही. त्यामुळे वनविभागाच्या मलमपट्टी उपाययोजनांविषयी परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत.