लैंगिक अत्याचारप्रकरणी लष्करी अधिकारी दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:14+5:302021-03-24T04:14:14+5:30
नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात जुलै २०१९ साली भरती झालेल्या एका नवीन प्रशिक्षणार्थी जवानावर आरोपी पाण्डेय यांनी लैंगिक अत्याचार केल्याची ...
नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात जुलै २०१९ साली भरती झालेल्या एका नवीन प्रशिक्षणार्थी जवानावर आरोपी पाण्डेय यांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. पाण्डेय यांच्याविरुद्ध भारतीय सैन्य कायद्याच्या कलम-४६ (अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी प्रारंभी उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक एम.डी. परदेशी यांनी पोलीस तपास केला. लष्करी अधिकाऱ्यांवर आरोप असल्यामुळे लष्करी नियमानुसार या गुन्ह्याची चौकशी व पुढील कारवाई लष्करी न्यायालयाकडे सोपविण्यात आली. पीडित जवानाचे वकील सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल ॲड. एम. आनंद यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. नुकत्याच भरती झालेल्या जवानावर पाण्डेय यांनी लैंगिक हल्ला केल्याचा तसेच लष्करी परंपरेविरुद्ध वर्तणूक केल्याचा आरोप ‘कोर्ट मार्शल’दरम्यान सिद्ध झाला. लष्करी न्यायालयाने या दोन्ही आरोपांखाली पाण्डेय यास दोषी धरले आणि तीन वर्षांचा सश्रम कारावास व सेवेतून बडतर्फ करण्याची शिक्षा ठोठावल्याचे आनंद यांनी सांगितले. आनंद यांनी सबळ पुरावे लष्करी न्यायालयात सादर करत प्रभावीपणे पीडित जवानाची बाजू मांडली. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ऐकू्न घेत पुराव्यांच्या आधारे पाण्डेय यास दोषी ठरविले.