देशसेवाच सैनिकी धर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:30 AM2017-08-27T00:30:30+5:302017-08-27T00:30:35+5:30
आपण जरी विविध प्रांतांचे असलो आणि भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी तुम्ही आता जगातील सर्वोत्कृष्ट अशा भारतीय सेनेच्या तोफखान्याचे सैनिक बनले आहात. त्यामुळे देशसेवा हाच तुमचा धर्म आहे, असे प्रतिपादन मेजर जनरल संजीव चौधरी यांनी केले.
नाशिक : आपण जरी विविध प्रांतांचे असलो आणि भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी तुम्ही आता जगातील सर्वोत्कृष्ट अशा भारतीय सेनेच्या तोफखान्याचे सैनिक बनले आहात. त्यामुळे देशसेवा हाच तुमचा धर्म आहे, असे प्रतिपादन मेजर जनरल संजीव चौधरी यांनी केले. देशाच्या सर्वांत मोठ्या अशा नाशिकरोडच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सलामी मंचावर ब्रिगेडियर जी. एस. बिंद्रा उपस्थित होते. शनिवारी (दि.२६) नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ते म्हणाले, तिरंगा आणि तोफांच्या समोर घेतलेली शपथ आपल्या पूर्ण कारकिर्दीत लक्षात ठेवावी. कुठल्याही प्रकारचा राजकीय विचार मनात न आणता शारीरिक-मानसिकदृष्ट्या सक्षम रहावे. आपल्या कौशल्याच्या बळावर देशसेवेत भरीव योगदान देऊन एकात्मता व सांघिक कामगिरीचा सातत्याने प्रयत्न करावा, असा गुरूमंत्र चौधरी यांनी दिला. तोफखाना केंद्राच्या सैन्यदलात भरती झालेल्या ३८२ प्रशिक्षणार्थी जवानांनी सैन्याच्या प्राथमिक व प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने ४२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज असून, विविध ‘युनिट’मध्ये सैन्य दलाच्या तोफखान्यात हे नवसैनिक भविष्यात योगदान देणार आहेत. लष्करी बॅण्डच्या ‘शेर-ए-जवान’ ही वैशिष्ट्यपूर्ण धूनच्या तालीवर नवसैनिकांच्या तुकडीचे लष्करी थाटात वरुणराजाच्या साक्षीने आगमन झाले. दरम्यान, चौधरी हे सलामी मंचावर येताच जवानांच्या तुकडीने त्यांना ‘सॅल्यूट’ केले. लष्करी बॅण्डच्या तालावर जवानांच्या तुकडीने सशस्त्र संचलन सादर केले. दरम्यान, ‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना बलिदान देना पडे...’ अशी शपथ जवानांनी यावेळी घेतली.
‘मेरी संतान देश को समर्पित’
शपथ विधी सोहळ्यादरम्यान तोफखाना केंद्राच्या वतीने वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्या हस्ते ३८२ जवानांच्या माता-पित्यांना भारतीय सेनेचे विशिष्ट पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर पदकावर ‘मेरी संतान देश को समर्पित’ असे अभिमानास्पद शब्द लिहिलेले आहे. यावेळी अधिकारी वर्गाने पालकांसोबत चर्चा करीत संवाद साधला. याप्रसंगी बहुतांश माता-पित्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले.
या जवानांचा झाला गौरव
उत्कृष्ट गनर, तांत्रिक सहायक, वायरलेस आॅपरेटर, वाहनचालक म्हणून जवानांना स्मृतिचिन्ह, पदक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अष्टपैलू कामगिरीचे पारितोषिक राहुल शर्मा यांनी पटकाविले. तसेच मुकेशकुमार शर्मा, अतुल सिंग, गनर राहुल, मोहित, कमलेशकुमार यादव, कमल कुमार, सरबजितसिंग पेलिया, गुलेशकुमार यांना वरील श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले.
‘शेर-ए-जवान’ने वेधले लक्ष
लष्करी थाट... शिस्त... लक्षवेधी पारंपरिक गणवेशामध्ये तोफखान्याचे बॅँड पथकाने सरस देशभक्तीपर गीतांची चाल वाजविली. यावेळी उपस्थित जवानांच्या तुकडीने ‘शेर-ए-जवान’ या लक्षवेधी धूनवर संचलन सादर करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फे डले. यावेळी मैदानावर आणलेल्या विविध मीडियम गन (तोफ)च्या सन्मानार्थ उपस्थित सर्व अधिकारी व नवसैनिकांचे कुटुंबीय जागेवर उठून उभे राहिले.
देशातील सर्वांत मोठे प्रशिक्षण केंद्र
नाशिकरोड-देवळालीच्या मध्यभागी असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या अशा तोफखाना केंद्रात दरवर्षी सरासरी तीन ते चार हजार नवसैनिक प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल होतात. प्राथमिक चाचण्यानंतर ४२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण व १९ आठवड्यांचे प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण जवान पूर्ण करतात. यामध्ये शारीरिक आरोग्यासह शस्त्रास्त्रे हाताळणी, सैनिकी प्रात्यक्षिके आदी बाबींचे तंत्रशुद्ध मार्गदर्शनाखाली सराव करतात.