जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:05 AM2020-04-09T00:05:40+5:302020-04-09T00:05:54+5:30
संपूर्ण देशात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील दूध वितरणावर विपरीत परिणाम झाला असून, त्यामुळे दूध व्यवसायाशी संबंधित सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. गेल्या १० दिवसांत दुधाचे दर तब्बल १० रुपयांनी घसरले आहेत. परिणामी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
नाशिक : संपूर्ण देशात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील दूध वितरणावर विपरीत परिणाम झाला असून, त्यामुळे दूध व्यवसायाशी संबंधित सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. गेल्या १० दिवसांत दुधाचे दर तब्बल १० रुपयांनी घसरले आहेत. परिणामी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वितरणावर परिणाम झाल्यामुळे दोन-तीन दिवस टॅँकर खाली होत नसल्यामुळे काही संस्थांनी दिवसाआड संकलन करण्यास सुरु वात केली आहे .
जिल्ह्यात खासगी आणि सहकारी संस्थांकडून दररोज सुमारे सहा ते साडेसहा लाख लिटर दूध संकलन केले जाते. त्यात सर्वाधिक वाटा सिन्नर तालुक्याचा आहे. सिन्नर तालुक्यात सुमारे तीन ते साडेतीन लाख, येवला तालुक्यात १.५० ते २ लाख, तर निफाड तालुक्यात सुमारे एक लाख लिटर दूध संकलन होत असते. या तीन तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यात दूध उत्पादन कमी आहे. जिल्ह्यातून संकलित झालेले दूध गुजरातमधील अमूल, मंचर येथील पराग, श्रीरामपूर येथील प्रभात, अहमदनगर येथील पारस या दूध डेअरींना पाठविले जाते. याशिवाय गुजरातमधील सूरत जिल्ह्यात दूध वितरित होते. याशिवाय येवला तालुक्यात अमूल दूध डेअरी अंतर्गत दोन संस्था दूध संकलनाचे काम करतात. याशिवाय काही खासगी संस्थाही कार्यरत आहेत. जिल्ह्यात संचारबंदी असली तरी त्याचा दूध संकलनावर फारसा परिणाम झालेला नाही .
दूध वितरणात संस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे टॅँकर वेळच्यावेळी खाली होत नाहीत. दुधाची मागणी कमी झाल्याने संस्थांना पेमेंट वेळेवर मिळत नाही. शिवाय दुधाच्या इतर उपपदार्थांची मागणी घटल्याने मोठ्या प्रमाणात दूध पडून आहे.
दरम्यान, एकट्या सिन्नर सहकारी दूध संघाची नाशिकच्या किरकोळ बाजारात दररोज सुमारे २००० लिटरची विक्री होते. मागणी कमी झाल्याने आज ही विक्री २०० लिटरवर आली आहे. सुमारे ९० टक्के विक्री कमी झाल्याने संघासमोर विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत.
परिणामी दुधाचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. २० मार्च रोजी दुधाला प्रतिलिटर ३२ रु पये भाव मिळत होता. १ एप्रिल रोजी तोच दर २२ रु पयांवर आला आहे. संचारबंदीमुळे काही खासगी संस्थांनी संकलन बंद केले आहे किंवा ते दिवसाआड किंवा दोन दिवसाआड संकलन करतात. सहकारी संस्थांना मात्र दररोज संकलन करावे लागते. याशिवाय सहकारी संस्थांना दर पाच दिवसांनी शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात यामुळे शासनाने सहकारी संस्थांना खेळत्या भांडवलाची मदत करावी, अशी मागणी होऊ लागली आहे .
प्रकल्पांना भागभांडवल देण्याचा आग्रह
दुधाचे दर कमी होऊ लागल्याने शासनाने २५ रुपये दर देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, मात्र यामुळे दूध प्रकल्प अडचणीत येतील, असे एका संस्थेच्या व्यवस्थापकांनी सांगितले. तूट भरून काढण्यासाठी शासनाने दूध प्रकल्पांना भागभांडवल देऊन मदत केली तरच शेतकºयांना पेमेंट करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.