दूध, भाजीपाल्याची आधीच साठवणूक
By Admin | Published: June 3, 2017 12:35 AM2017-06-03T00:35:43+5:302017-06-03T00:35:59+5:30
नाशिक : आधाराश्रम, महिलाश्रम आदि सामाजिक संस्था आदि ठिकाणी भाजीपाला व दुधाची तजवीज करून ठेवल्यामुळे हाल झाले नसल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संपाची पूर्वकल्पना असल्याने आधाराश्रम, महिलाश्रम आदि सामाजिक संस्था, जिल्हा रुग्णालय आदि ठिकाणी भाजीपाला व दुधाची तजवीज करून ठेवल्यामुळे फारसे हाल झाले नसल्याचे दिसून येत आहे.
आधाराश्रमात ३ ते ५ दिवसांचा भाजीपाला आगाऊ खरेदी करून ठेवण्यात आला असून, नियमित दुधाचा रतीब सुरू असल्याने दुधाचीही अडचण भासली नसल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हाभरातून निरनिराळ्या आजारांवरील उपचारासाठी, अपघात, बाळांतपण आदि कारणांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचीही जेवण, दूध, चहा याबाबत गैरसोय झाली नाही. जिल्हा रुग्णालयात दूध पुरवठा करणाऱ्या नियमितच्या दूधवाल्याव्यतिरिक्त संपामुळे अज्ञात व्यक्तीने मोफत मोठी किटली भरून दूध आणून दिले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात बालविभागाला सध्यातरी दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांचा संप आणखी काही दिवस चालला तर मात्र गैरसोय होऊ शकते, अशी शक्यता या संस्थांकडून वर्तविण्यात आली आहे. अशीच माहिती गणेशवाडीतील अवेकनिंग जागृती या अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या संस्थेतर्फे देण्यात आली.
या संस्थेत सध्या ४० मुले असून, लक्ष्मीनारायण चॅरिटेबल संस्थेतर्फे मुलांसाठी नास्टा, जेवण दिले जाते. भाज्यांचा तुटवडा झाल्यास मात्र परिस्थिती अवघड होऊ शकते असे सांगण्यात आले.