दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प
By admin | Published: June 6, 2017 03:20 AM2017-06-06T03:20:33+5:302017-06-06T03:20:42+5:30
नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मुंबई, गुजरातकडे भाजीपाला व दुधाचा एकही टॅँकर रवाना होऊ शकला नसल्याने टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमुळे दिवसभर नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मुंबई, गुजरातकडे भाजीपाला व दुधाचा एकही टॅँकर रवाना होऊ शकला नसल्याने टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात कांदा, दूध व भाजीपाला रवाना करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संप सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम शेतमाल वाहतुकीवर झाला असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेतमाल लिलावासाठी येत नसल्याने बाजार समित्या ओस पडल्या आहेत. अशा परिस्थितीत ज्या व्यापाऱ्यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी करून वाशी, मुंबई येथे माल पाठविण्याची तयारी दर्शविल्याने गेल्या तीन दिवसांपासून काही प्रमाणात माल बाहेरगावी पाठविला जात आहे.