दूध, भाजीपाला वाहतूक रोडावली
By admin | Published: June 6, 2017 11:34 PM2017-06-06T23:34:26+5:302017-06-06T23:40:00+5:30
व्यापाऱ्यांमध्ये भीती : जेमतेम टॅँकर मुंबईकडे रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संपाची तीव्रता कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीतील व्यापाऱ्यांनाच शेतमालाचा लिलाव वा त्याची वाहतूक न करण्याबाबत समज दिल्यामुळे संपाच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यातून जेमतेम दूध व भाजीपाला मुंबईकडे रवाना करण्यात आला. शेतमालाची वाहतूक करणारे वाहने आंदोलनकर्त्यांच्या रडारवर असल्यामुळे मालवाहतूकदारही धजावत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शेतकरी संपासाठी गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समितीने मंगळवारी शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आंदोलन जाहीर केले होते, त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारी सायंकाळनंतर शेतमालाची वाहतूक बंद ठेवली होती. शेतमालाची वाहतूक सुरू असल्यावर आंदोलनकर्ते अधिकच संतप्त होत असल्याची भावना बाजार समित्यांनी तसेच व्यापाऱ्यांनीही यापूर्वीच व्यक्तकेली आहे. व्यापारी व स्थानिक शेतकरी यांचे अनेक वर्षांपासूनचे संबंध आहे. शेतकरी संप यशस्वी व्हावा साठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. अशात व्यापाऱ्यांनी शेतमालाचे लिलाव वा मालाची वाहतूक केल्यास त्याचा संपावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल पाठवू नये, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले होते. शेतकरी व व्यापारी यांचे संंबंध कायम राहावेत यासाठी व्यापाऱ्यांनी माल पाठविण्याबाबत हात अखडता घेतला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत माल पाठविणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्याने शेकडो ट्रक भाजीपाला, कांदा मुंबईकडे रवाना करण्यात आला, परंतु सोमवारपासून त्यात मोठी कपात झाली आहे.
मंगळवारी फक्त २८ दुधाचे टॅँकर, ५५ ट्रक भाजीपाला व इतर ३० ट्रक असा शेतमाल मुंबईकडे पाठविण्यात आला आहे. सोमवार व मंगळवार असे लागोपाठ दोन दिवस मालवाहतूक रोडावल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर होण्याची शक्यता असून, विशेष करून कांद्याची वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्याने कांदा महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तीन समित्यांमध्ये लिलावगेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्णातील सतराही बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णत: ठप्प झालेले असताना मंगळवारी सहाव्या दिवशी घोटी, नांदगाव व मनमाड या तीन बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी माल आणल्यामुळे अल्प प्रमाणात का होईना लिलाव सुरू करण्यात आला.
घोटी येथे ३८९ क्विंटल, नांदगावला दहा व मनमाडला
३१ क्विंटल शेतमाल विक्रीसाठी आणण्यात आला. अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र शुकशुकाट होता.