कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By admin | Published: June 2, 2017 01:21 AM2017-06-02T01:21:59+5:302017-06-02T01:22:11+5:30

पंचवटी : शेतकऱ्यांनी कर्जमाफी ,विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संप पुकारल्याने त्याचा परिणाम बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर झाला

Millennium turnover jam | कोट्यवधींची उलाढाल ठप्प

कोट्यवधींची उलाढाल ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी तसेच विविध मागण्यांसाठी गुरुवार (दि.१)पासून संप पुकारल्याने त्याचा परिणाम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर झाला. दररोज शेतकरी व शेतमालाने फुलणारी बाजार समिती गुरुवारी सकाळपासून पूर्णपणे ओस पडलेली होती. या दिवशी बाजार समितीत कोणत्याही प्रकारचा शेतमाल दाखल झाला तर नाहीच, परंतु कोणत्याही प्रकारचे व्यवहार न झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील अंदाचे अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
गुरुवारपासून शेतकरी संपावर जाणार असल्याने दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात फळ व पालेभाज्यांची आवक वाढलेली होती. बाजार समितीत दैनंदिन पाच ते साडेपाच हजार क्विंटल शेतमाल विक्रीसाठी दाखल होतो. दोन दिवसांपूर्वी आवक वाढल्याने साधारणपणे एक हजार क्विंटलपर्यंत शेतमालाची आवक वाढलेली होती. दैनंदिन बाजार समितीत अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होत असते मात्र गुरुवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारची उलाढाल झाली नाही. बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे गाळे पूर्णपणे बंद होते, तर आवारात स्मशानशांतता पसरलेली होती. येथे काम करणारे हमाल काम नसल्याने दुकानांच्या बंद गाळ्यांसमोरे बसलेले होते. व्यवहार पूर्णपणे बंद असल्याने परिसरातील हॉटेल्स तसेच अन्य विविध वस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये गर्दी दिसत नव्हती.दररोज शेतकरी व शेतमालाने फुलणारे पेठरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार गुरुवारी सकाळपासून असे पूर्णपणे ओस पडले होते.

Web Title: Millennium turnover jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.