मनपाच्या झोळीत सव्वा कोटी
By admin | Published: March 7, 2017 01:30 AM2017-03-07T01:30:27+5:302017-03-07T01:30:41+5:30
नाशिक : महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून प्रचारयंत्रणेवर कोट्यवधी रुपयांची उधळण झाली.
नाशिक : महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून प्रचारयंत्रणेवर कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. उमेदवारांच्या या प्रचारखर्चामुळे महापालिकेच्याही झोळीत सुमारे सव्वा कोटींचे दान पडले आहे. अनेक उमेदवारांच्या जप्त अनामत रकमेपोटीही महापालिकेला लाखो रुपयांची कमाई झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली होती. त्यानुसार, निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या प्रचारासाठी रीतसर शुल्क भरून परवानगी घेणे क्रमप्राप्त करण्यात आले होते. उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यापूर्वी ना हरकत दाखले मिळविण्यात आले. त्यासाठीही शुल्क आकारले जात होते. शिवाय चौकसभा, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे लावणे, प्रचार वाहने यासाठी परवानगी आवश्यक करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेने सहाही विभागीय कार्यालात एक खिडकी योजना कार्यान्वित करत दरपत्रक जारी केले होते. महापालिका निवडणुकीत शहरात ठिकठिकाणी चौकसभा झाल्या, तर गोल्फ क्लबवर प्रामुख्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा झाल्या. महापालिकेला या जाहीर सभा, चौकसभा,पोस्टर्स, बॅनर्स, प्रचार वाहने ना हरकत दाखले यांच्या माध्यमातून ६२ लाख ३६ हजार ९६८ रु पयांची कमाई झाली आहे. महापालिकेने उमेदवारांसह राजकीय पक्षांसाठी अंतिम मतदार याद्याही सीडी स्वरूपात उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यातूनही महापालिकेला सर्वाधिक कमाई झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेला उमेदवारांच्या अनामत रकमेतून ६७ लाख ७२ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यातील जप्त अनामत रक्कमही महापालिकेच्या खजिन्यात जमा होणार आहे.