धामोडे ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:05 AM2019-11-18T01:05:06+5:302019-11-18T01:06:12+5:30
येवला तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेचा सुमारे ३९ लाख ३९ हजार ३१९ रुपये इतका निधी रोजगार सेवकानेच हडप केल्याचे उघडकीस आले आहे.
येवला : तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेचा सुमारे ३९ लाख ३९ हजार ३१९ रुपये इतका निधी रोजगार सेवकानेच हडप केल्याचे उघडकीस आले आहे.
धामोडे ग्रामपंचायतीमधील रोजगार हमी योजनेच्या नियोजन कामासाठी कंत्राटी ग्रामरोजगार सेवक म्हणून संशयित आरोपी मंगेश तानाजी भड (३०) रा. धामोडे हल्ली, विठ्ठलनगर येवला याची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामपंचायत व बँकेमधील आर्थिक व्यवहारांची माहिती संशयित आरोपी मंगेश भड यास होती, याचाच गैरफायदा घेत सदर आरोपीने दि. २२ एप्रिल ते २८ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत धामोडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधून देना बँक व अॅक्सिस बँकेच्या चेकबुकमधील काही चेक काढून घेऊन त्या चेकवर तत्कालीन सरपंच शोभा नामदेव भड (रा. धामोडे) व तत्कालीन ग्रामसेवक गंगाधर काशीराम गवळी यांच्या बनावट सह्या करून व बनावट शिक्के मारून बँकेमध्ये आरटीजीएसद्वारे सुमारे ३९ लाख ३९ हजार ३१९ रुपये इतका मोठा निधी अनुक्रमे राहुल बबन कांबळे, अष्टविनायक ट्रेडर्स व विश्वकर्मा अॅल्युमिनियम तथा मंगेश व रवींद्र गोरखनाथ या नावाच्या खात्यांवर वळविले, यामुळे धामोडे ग्रामपंचायतीची लाखोंची फसवणूक झाली असून, सदरची फिर्याद विद्यमान ग्रामसेवक भगवान बाबासाहेब गायके यांनी येवला तालुका पोलिसांत दिली. येवला तालुका पोलिसांनी गुन्हा नोंद करून संशयित आरोपी मंगेश तानाजी भड यास अटक केली असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे हे करीत आहे.