अंगणवाड्यांची कोट्यवधींची बांधकामे रखडली
By admin | Published: March 7, 2017 01:06 AM2017-03-07T01:06:35+5:302017-03-07T01:06:50+5:30
नाशिक : अंगणवाड्यांची कामे रखडण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे वृत्त आहे
नाशिक : कोट्यवधी रुपयांचे अनुदान प्राप्त असूनही सुमारे पाच ते सात कोटी रुपयांच्या अंगणवाड्यांची कामे रखडण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर निविदा लिपिक अमित आडके यालाही निलंबनाची कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे समजते.
कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांच्या वाहनाला मुंबई - आग्रा महामार्गावर अपघात झाल्याने तेव्हापासून मिलन कांबळे रजेवरच होते. दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अखर्चित निधीबाबत आढावा बैठकीतून माहिती घेतली असता बांधकाम विभाग दोनकडील १५३ अंगणवाड्यांच्या कामांपैकी अवघ्या ७५ ते ८० अंगणवाड्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे आढळले. तसेच ७३ कामांचे सुमारे पाच ते सात कोटींच्या अंगणवाड्यांची बांधकामे बांधकाम विभाग दोनकडे प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी काही मक्तेदारांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेच आम्हाला अंगणवाड्यांची कामे मिळालीत मात्र त्यासाठीच्या कार्यारंभ आदेश मिळत नसल्याची तक्रार केली होती.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांना सोबत घेत बांधकाम विभाग दोनला भेट देत कार्यकारी अभियंता मिलन कांबळे व निविदा लिपिक अमित आडके यांच्या टेबलांची दप्तर तपासणी केली. त्यात ७३ अंगणवाड्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश अद्यापही काढले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अपघातानंतर घाईगर्दीत रुजू होण्यास आलेल्या कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांना मिलिंद शंभरकर यांनी रुजू करून घेतले नाही.
उलटपक्षी कोट्यवधींची कामे का रखडली, याबाबत विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच ही कामे हेतुपूर्वक प्रलंबित ठेवली का? कामे प्रलंबित राहिल्याने तुम्हाला निलंबित करण्यात का येऊ नये? अशी नोटीस लिपिक अमित आडके यांना बजावली आहे. अमित आडके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)