अंगणवाड्या बंदमुळे लाखो बालके पोषण आहाराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:30 PM2020-03-18T18:30:44+5:302020-03-18T18:34:49+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाड्यांमधील सव्वातीन लाख बालके गेल्या दोन दिवसांपासून घरीच असून, यात कुपोषित बालकांचाही समावेश आहे. मुळातच कुपोषण व त्यात पोषण आहार बंद झाल्यामुळे या बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आले नसल्याने एकात्मिक बाल विकास विभागही हतबल झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपाययोजनांमुळे ग्रामीण भागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मदत होत असली तरी, अंगणवाड्यांमधील बालकांची मात्र हेळसांड होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५२८२ अंगणवाड्या असून, त्यात सुमारे सव्वा तीन लाख बालके दाखल आहेत. या बालकांना सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत अंगणवाडी सेविकांमार्फत आरोग्याची काळजी, पोषण आहार दिला जातो. मुख्यत्वे करून या अंगणवाड्यांमध्ये ग्रामीण भागातील व त्यातल्या त्यात आदिवासी भागातील कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहे. कुटुंबाकडून बालकांचे आरोग्य व उदरभरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या बालकांच्या आरोग्याची काळजी म्हणून अंगणवाड्यांच्या माध्यमातून त्याचे पोषण केले जात आहे. तथापि, गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंगणवाड्या बंद करण्यात आल्याने बालकांना त्यांच्या घरीच ठेवण्यात आले आहे. काही बालकांचे आई-वडील दिवसा शेतीकामासाठी बाहेर जात असल्यामुळे या बालकांच्या पोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना पोषण आहार व वैद्यकीय औषधांपासूनही वंंचित रहावे लागत असून, त्यात कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत या बालकांना औषध पुरवठा केला जात असला तरी, पोषण आहार बंद झाल्याने या बालकांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.