महात्मा गांधी रोडवरील दुकानदाराची लाखोंची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:40 AM2018-07-24T00:40:54+5:302018-07-24T00:41:09+5:30
महात्मा गांधी रोडवरील इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ३७ बनावट ग्राहकांनी फायनान्स करून वस्तू खरेदी केल्याचे दाखवून खासगी फायनान्स कंपनीच्या दोन प्रतिनिधींनी दुकानदाराची १५ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
नाशिक : महात्मा गांधी रोडवरील इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ३७ बनावट ग्राहकांनी फायनान्स करून वस्तू खरेदी केल्याचे दाखवून खासगी फायनान्स कंपनीच्या दोन प्रतिनिधींनी दुकानदाराची १५ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी बजाज व एचडीबी फायनान्सचे प्रतिनिधी सुनील साबणे (रा. सुभाष वाचनालयाजवळ, मिरजकर वाडा, सोमवार पेठ) व रवि महाले (रा. चौथी स्कीम, सिडको) या दोघांविरोधात भद्रकाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र पारख (रा़ गंगापूररोड) यांचे महात्मा गांधी रोडवरील स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या बिल्डिंग नंबर ५ मध्ये पारख इलेक्ट्रॉनिक हे दुकान आहे. या दुकानात एचडीबी फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी संशयित रवि महाले व बजाज फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी संशयित सुनील साबणे या दोघांनी जून २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत पारख यांची १५ लाख ११ हजार ५६५ रुपयांची फसवणूक केली़ संशयित महाले याने एचडीबी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून २८ ग्राहकांना तर साबणे याने बजाज फायनान्समार्फत नऊ ग्राहकांना दुकानातील विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू फायनान्सद्वारे मिळवून देत आहोत, असे दाखविण्यासाठी दुकानमालकासमोर बनावट ग्राहक उभे करून ते खरे असल्याचे दाखविले़ या ३७ बनावट ग्राहकांचा फायदा घेऊन या दोघा संशयितांनी पारख इलेक्ट्रॉनिक्सचे मालक राजेंद्र पारख यांची १५ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली़