मालकाच्या नावे केली लाखोची फसवणूक
By Admin | Published: October 30, 2016 12:07 AM2016-10-30T00:07:19+5:302016-10-30T00:07:37+5:30
मालकाच्या नावे केली लाखोची फसवणूक
नाशिक : बँकेतून पैसे काढणाऱ्या नोकरास एका भामट्याने तुमच्या मालकाने माझ्याकडे पैसे देण्यास सांगितल्याची बतावणी करून एक लाख रुपयांना चुना लावल्याची घटना महात्मा गांधी रोडवरील आयडीबीआय बँकेत घडली़
कॉलेजरोडवरील येवलेकर मळा परिसरातील सिन्हा संकुलमधील रहिवासी विनोदकुमार त्रिलोकचंद सिंघल (५९) यांनी आपल्याकडे कामास असलेल्या हरिभाऊ पतंगे यास नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास आयडीबीआय बँके तून एक लाख रुपये काढून आणण्यास सांगितले़ त्यानुसार पतंगे याने बँकेतून रक्कम काढून जिन्याने खाली उतरत असताना आलेल्या एका संशयिताने, सिंघल साहेबांनी माझ्याकडे पैसे देण्यास सांगितले आहे, अशी बतावणी केली़ या संशयितावर विश्वास ठेवून पतंगे यांनी आपल्याकडील एक लाखाची रोकड या माणसाकडे दिली़ तसेच मालक सिंघल यांना तुम्ही सांगितलेल्या इसमाकडे मी पैसे दिल्याचे सांगितले, तेव्हा या फसवणुकीचा उलगडा झाला़ याप्रकरणी सिंघल यांच्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.